पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖
कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
कलंकीति वा – माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
मूर्ध्नि धत्से तमेव – तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
त्वदंगीकृताः
शर्व सर्वेऽपि धन्याः – हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply