न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश |
तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा ‖ १३ ‖
काव्य-शास्त्रात व्याज स्तुती किंवा व्याज निंदा अलंकार आहेत. अर्थात लेखक जे लिहित असतो त्याच्या वेगळाच अर्थ अपेक्षित असतो.
वरपांगी निंदा दिसते. अपेक्षित असते स्तुति. वरपांगी स्तुती केलेली असते मात्र प्रत्यक्षात निंदा करायची असते.
अशीच काहीशी रचना या श्लोकात आचार्यश्री करतात. ते म्हणतात,
न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश – हे भगवान गिरिजापती ! मी कधीही कोणाचा लेशमात्र देखील द्रोह करू शकत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसे प्रसन्न व्हाल? हेच मला समजत नाही.
वास्तविक कुणाचाही द्रोह न करणाऱ्यावरच भगवान प्रसन्न होणार. मात्र येथे आचार्यश्री उलट बोलत आहेत. इतकेच नव्हे तर ते पुढे म्हणतात,
तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा – तुम्ही प्रसन्न होता ते पण कोणावर? तर जे पत्नी कन्या किंवा पित्याशी द्रोह करतात.
पत्नीशी बेईमानी करणारा रावण, कन्येचा अपमान करणारा दक्ष आणि वडिलांची इच्छा नाकारून तप करणारी पार्वती, यांना भगवान प्रसन्न झाले. अशा विविध कथा पुराणांमध्ये आपणास वाचावयास मिळतात.त्या पौराणिक कथांचा आचार्य संदर्भ घेतात. त्यांच्यावर भगवान शंकरांनी कृपा केली होती.
तुम्ही अशा द्रोहींना प्रसन्न होता. यात भगवंताची वरपांगी निंदा वाटते.
मात्र त्यांना म्हणायचे आहे की अशा सगळ्यांवर, अशा अशास्त्रीय कृती करणाऱ्यांवर देखील आपण कृपा करता ,मग माझ्यासारख्या स्वच्छ व्यक्तीचा अव्हेर कसा कराल?
यांच्या उद्धारात निंदा नाही तर त्यांचाही उद्धार करण्याइतके आपण उदार आहात अशी स्तुतीच आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply