शिरो दृष्टि हृद्रोग शूल प्रमेहज्वरार्शो जरायक्ष्महिक्काविषार्तान् |
त्वमाद्यो भिषग्भेषजं भस्म शंभो
त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय ‖ १५ ‖
जगद्गुरूंच्या अफाट संदर्भ विश्वाची चुणूक दाखवणारा हा श्लोक. आरंभीच्या दोन चरणात त्यांनी विविध रोगांची सूची सादर केली आहे.
शिरो – डोक्याशी संबंधित रोग,
दृष्टि- दृष्टीशी संबंधित रोग,
हृद्रोग- हृदयाशी संबंधित रोग,
शूल – आयुर्वेदात वर्णिलेले वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, आमज, वातश्लैष्मिक, पित्तश्लैष्मिक तथा वातपैत्तिक हे आठ प्रकारचे शूल म्हणजे आतून काटा टोचल्याप्रमाणे वेदना देणारे रोग,
प्रमेह- यौवनांगाशी संबंधित रोग, प्रदर रोग,
ज्वर- आयुर्वेदात वर्णिलेले वातजन्य, पित्तजन्य किंवा रसगत, रक्तगत, मांसगत, मज्जागत इ. सर्व प्रकारचे ताप,
अर्श- मूळव्याध, गुदद्वाराशी संबंधित रोग,
जरा- म्हातारपण, त्यामुळे येणारे रोग,
यक्ष्म- फुफ्फुसे तथा श्वास यंत्रणेत होणारे क्षयरोग,
हिक्का- पोटात समान आणि कंठात उदान वायु च्या प्रकोपाने निर्माण होणारे उचकी, ठसका इत्यादी रोग,
विषार्तान् – विषाच्या परिणामाने होणारे रोग,
अशा प्रकारच्या अनेक रोगाने माणूस ग्रस्त होतो. अशा सर्व रोगांनी त्रस्त असणाऱ्या जीवांसाठी,
त्वमाद्यो भिषग्- आपणच आद्य म्हणजे श्रेष्ठ भिषग् म्हणजे वैद्य आहात.
भेषजं भस्म शंभो- हे शंभो ! या सर्व रोगांवर आपल्या दृष्टीने भस्म हेच औषध आहे.
अर्थात आपल्या चरणकमलांवरील भस्मानेच हे सर्व रोग दूर होतात.
त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय – हे भगवंता माझे शरीर हलके करण्यासाठी मला या रोगां मधून दूर कर.
रोग झाले की शरीर जड होते. त्यामुळे शरीर हलके कर अर्थात मला निरोगी कर. तसेच शेवटी या जड शरीरापासून मोकळे करून मुक्ती प्रदान कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply