भवान्यै भवायापि मात्रे च पित्रे
मृडान्यै मृडायाप्यघघ्न्यै मखघ्ने |
शिवांग्यै शिवांगाय कुर्मः शिवायै
शिवायांबिकायै नमस्त्र्यंबकाय ‖ १८ ‖
शिवशक्ती हे अभिन्न ऐक्य. अर्धनारीनटेश्वर स्वरूपात त्यांचे एकरूपत्व वंदिले जाते. भवं भवानीसहितं नमामि ! अशा स्वरूपात आपण या युगुलाला वंदन करतो. प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री देखील असे युग्मवंदन करीत आहेत.
हे वंदन करीत असताना देखील आचार्यश्री दोघांच्याही बाबतीत समान स्वरूपाची विशेषणे वापरत आहेत. जणूकाही त्यातूनही ते या दोघांच्या एकरूपत्वाचेच निर्देशन करीत आहेत.
भवान्यै भवायापि – आई भवानीला आणि भव असणाऱ्या आपणाला,
मात्रे च पित्रे – मातेला आणि पितृ स्वरूप आपल्याला,
मृडान्यै मृडायापि- मृडाणीला आणि मृड असणाऱ्या आपणास, भगवान शंकरांना मृडअसे म्हणतात. या संस्कृत धातूचा अर्थ संतुष्ट करणे असा आहे. संपूर्ण विश्वाला संतुष्ट करणारी भगवान शंकर मृड तर देवी पार्वती मृडाणी रूपात वंदिली जाते.
अघघ्न्यै मखघ्ने – अघ म्हणजे पापाचा, कलंकाचा विनाश करणाऱ्या आईला आणि मख म्हणजे यज्ञाचा विनाश करणार्या आपल्याला, भगवान शंकरांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विनाश केला होता. त्या पौराणिक कथेचा येथे संदर्भ आहे.
ते दक्षयज्ञाचा विनाश करणारे आहेत असे वर्णन केल्यामुळे समानता दाखवण्यासाठी आई जगदंबेच्या पाप विनाशक रूपाला आचार्य वंदन करतात.
शिवांग्यै शिवांगाय- जिचे अंग,शरीर म्हणजे मूर्ती अतीव शिव म्हणजे पवित्र आहे अशा शिवांगी आणि शिवांग अशा आपल्याला,
शिवायै
शिवाय- शिव म्हणजे मंगल,पवित्र असणाऱ्या,
अंबिकायै त्र्यंबकाय – अंबिका जगज्जननी ला आणि त्र्यंबक अशा आपणाला हात,
नमस्कुर्म:- आम्ही वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply