यदा पुत्रमित्रादयो मत्सकाशे
रुदंत्यस्य हा कीदृशीयं दशेति |
तदा देवदेवेश गौरीश शंभो
नमस्ते शिवायेत्यजस्रं ब्रवाणि ‖ २३ ‖
भगवान श्रीशंकर महाकाल आहेत. कालकाल आहेत. त्यामुळे अंतिम समयी भगवान स्मशानवासी भोलेनाथाचे स्मरण भारतीय संस्कृतीचे एक कथन आहे.
भगवान शंकर हे जीवाचे तारक आहेत. जीवाच्या उद्धारासाठी तारक मंत्र तेच प्रदान करतात. त्यामुळे अंतिम समयी त्यांना शरण जाण्याची भूमिका आचार्य मांडत आहेत.
त्या अंतिम समयाचे वर्णन करताना ते म्हणतात,
यदा- ज्यावेळी
पुत्रमित्रादयो- पुत्र मित्र इत्यादी माझे नातेवाईक,
मत्सकाशे- माझ्याजवळ येऊन,
रुदंति- रडत असतील,
अस्य हा कीदृशीयं दशेति – अरे अरे काय ही याची दशा? असे म्हणत माझ्या मरणासन्न अवस्थेत चे वर्णन करीत असतील,
अर्थात माझ्या त्या जराजर्जर अवस्थेला पाहून, त्या बाह्य अवस्थेलाच माझी वास्तव अवस्था समजत ज्यावेळी ते शोक करीत असतील,
तदा – त्यावेळी
देवदेवेश- हे देवाधिदेव !
गौरीश शंभो- भगवान गौरीनाथा शंकरा,
नमस्ते शिवाय- नमः शिवाय , हा महामंत्र
इत्यजस्रं ब्रवाणि – मी अखंड जपत असावा.
आचार्यश्री म्हणत आहेत की अंतिम समयी देहाची परिस्थिती ही गलितगात्रच असणार आहे. पण तशी “परिस्थिती” असताना देखील माझी “मनस्थिती” वाईट असू नये.
जमलेले नातेवाईक बाहेर माझ्याबद्दल काहीही म्हणोत , मी आत मध्ये नमःशिवाय हेच म्हणत असावे. अंतरंगी आपल्या स्मरणाने शांती असावी. चिंतनात आपले नामस्मरण असावे.
बाहेरून पाहणाऱ्या नातेवाईकांना माझी अवस्था कशी ही दिसत असली तरी अंतरंगामध्ये मी चा नातेवाईकांशी नाही तर आपल्या चरणांशी गुंतलेला असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply