यदा श्वेतपत्रायतालंघ्यशक्तेः
कृतांताद्भयं भक्तिवात्सल्यभावात् |
तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे ‖ २८ ‖
याच साठी केला होता अट्टहास ! शेवटचा दिस गोड व्हावा !! ही संतांनी मनी जोपासली आपल्या मनात रुजवलेली भावना.
“अंत भला तो सब भला” ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक.
आचार्यश्री देखील त्याच भूमिकेतून अंतकाल मांगल्याची प्रार्थना करीत आहेत.
ते म्हणतात,
श्वेतपत्रायत – हे श्वेत, विशाल छत्रधारी भगवान शंकरा !
श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचे छत्र हे सम्राट् पदाचे लक्षण. केवळ सम्राटाने पांढरे छत्र वापरण्याचा राजकीय शिष्टाचार असतो.
देवांचे देव असणाऱ्या महादेवांना सम्राट् स्वरूपात आचार्य श्वेतपत्रायत म्हणत आहेत. त्यांना प्रार्थना आहे की,
यदा- ज्यावेळी, अंतिम समयी.
अलंघ्यशक्तेः- ज्यांच्या शक्तीला म्हणजे सत्तेला कोणीही ओलांडू शकत नाही अशा,
कृतांताद्भयं – कृतांत अर्थात यमराजाचे भय, मला सतावेल, भक्तिवात्सल्यभावात् – आपल्या भक्तवत्सल स्वभावाने, माझ्यावर असणाऱ्या आपल्या सहजसुलभ कृपेने,
तदा पाहि मां – त्यावेळी आपण माझे रक्षण करा.
पार्वतीवल्लभ- हे पार्वती वल्लभा, पार्वती हे स्थिरतेचे प्रतीक आहे. पर्वत अविचल असतो. त्या पर्वताची पुत्री ती पार्वती. तशीच शांत, स्थिर ती पार्वती. तशीच हवी श्रद्धा.
तशी दृढ, अटल श्रद्धा म्हणजे पार्वती. अशा पार्वतीचे वल्लभ अर्थात अशा श्रद्धेने प्रसन्न होणारे,
अन्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे – मला आपल्या समान माझा अन्य कोणीही रक्षण कर्ता दिसत नाही.
आपणच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझे अंतकाळीच्या यमपीडेपासून रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply