अमर्यादमेवाहमाबालवृद्धं
हरंतं कृतांतं समीक्ष्यास्मि भीतः |
मृतौ तावकांघ्र्यब्जदिव्यप्रसादाद्भवानीपते निर्भयोऽहं भवानि ‖ ३० ‖
महाभारतामध्ये आलेल्या विश्व प्रसिद्ध अशा यक्ष धर्मराज संवादात यक्षाने एक प्रश्न विचारला आहे की या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य काय? त्यावर उत्तर देताना श्री धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की जगामध्ये असंख्य लोकांना रोज मरतांना पाहून देखील पाहणारा स्वतःला अमर समजतो यापेक्षा मोठे आश्चर्य नाही.
श्री धर्मराजांचे उत्तर अत्यंत यथार्थ आहे. पण हा झाला अविवेकी माणसाचा विषय.
याउलट विवेकशील व्यक्ती नेमक्या याच गोष्टीने व्यथित होतो.
त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
अमर्यादम् – कोणत्याच प्रकारची मर्यादा अर्थात बंधन नसलेले,
एवाहम् – अशा त्या यमराजांना मी
आबालवृद्धं- बालकापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना
हरंतं कृतांतं – धरून नेणाऱ्या यमराजांना, समीक्ष्यास्मि भीतः – पाहून मी घाबरून जातो.
मृतौ – या मृत्यूच्या विषयात, तावकांघ्र्यब्ज- आपल्या चरणकमलांच्या,
दिव्यप्रसादाद्- दिव्य प्रसादामुळे
भवानीपते – ही भवानी पती भगवान शंकरा !
निर्भयोऽहं भवानि – मी निर्भय होवो.
भगवान यमराज खऱ्या अर्थाने समदर्शी आहेत. बालकापासून वृद्धापर्यंत, गरीबा पासून श्रीमंता पर्यंत, मूर्खा पासून पंडिता पर्यंत, कुरुपा पासून विश्वसुंदरी पर्यंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता ते सगळ्यांना नेतात. हे पाहिल्यावर ते मला तरी कसे सोडतील? हा विचार माझ्या मनात येऊन मी त्रस्त होतो.
अशावेळी आपली चरणकमले हेच माझ्या दुःख निवृत्तीचे एकमेव स्थान आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply