अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि प्ररोहै-
रवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः |
अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै-
रचंद्रार्धचूडैरलं दैवतैर्नः ‖ ३४ ‖
भगवान श्री भोलेनाथच्या ठायी असणाऱ्या अनन्य शरणतेला व्यक्त करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्री शंकरांच्या विविध वैभवांचे वर्णन करीत आहेत. या वैभवांनी युक्त असे भगवान शंकर माझे दैवत आहे ही सांगण्याची त्यांची पद्धत मोठी मनोज्ञ आहे. ते म्हणतात,
अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि- ज्यांच्या मस्तकावरील डोळ्यामधून अग्नीच्या लाटा उसळत नाहीत, प्ररोहैरवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः – ज्यांच्या डाव्या अंगावर अद्वितीय सौंदर्यवती शक्ती विराजित नाही,
अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै:- ज्यांच्या अंगावर भूषण स्वरूपात सर्प रुळत नाहीत,
अचंद्रार्धचूडै:- ज्यांच्या मस्तकावर चंद्रकोर विलसत नाही
अलं दैवतैर्नः – असे कोणतेही माझे दैवत नाही.
अर्थात अशी गुणवैशिष्ट्ये ज्यांच्या ठिकाणी नाहीत अशा कोणत्याही दैवतेला मी शरण जात नाही. हे सांगण्याच्या निमित्ताने आचार्य श्री वेगळ्या शब्दात भगवान श्री शंकराची वैभव मालिका आपल्यासमोर सादर करीत आहेत.
तृतीय नेत्रातून निघणारा अग्नी, मांडीवर बसलेली देवी पार्वती अंगावर रुळणारे सर्प आणि मस्तकावरील चंद्र या भगवान शंकराच्या सगळ्या गोष्टी वंदनीय आहेत. त्यांच्याशिवाय भगवान शंकरांची कल्पनाही करवत नाही.
या सगळ्या गोष्टींचे वैशिष्ट्य सांगण्याच्या निमित्ताने आचार्यश्री पूजना मध्ये असणाऱ्या ‘ सांगं सपरिवारं सशक्तिकम्’ या दृष्टीचा विचार आपल्या समोर ठेवत आहेत. त्यासोबतच भगवान शंकरांच्या ठायी असणारी एकनिष्ठता अधोरेखित करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply