अकंठेकलंकादनंगेभुजंगाद-
पाणौकपालादफालेऽनलाक्षात् |
अमौलौशशांकादवामेकलत्राद-
हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖
एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक.
आचार्यश्री म्हणतात,
अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग नाही,
अनंगेभुजंगात्- ज्यांच्या हातामध्ये दंडामध्ये सर्प बांधलेले नाहीत,
अपाणौकपालात् – ज्यांच्या हातामध्ये कपाल म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या कापलेल्या मस्तकाच्या कवटीचा भाग नाही,
अफालेऽनलाक्षात् – ज्यांच्या मस्तकावरील नेत्रातून अग्नी उसळत नाही,
अमौलौशशांकात् – ज्यांच्या मौली वर अर्थात मस्तकावर चंद्र विलसत नाही,
अवामेकलत्रात्- ज्यांच्या डाव्या अंगावर पत्नी विराजमान नाही,
अहं देवमन्यं न मन्ये न मन्ये – अशा अन्य कोणालाही मी देव मानतच नाही.
मागील श्लोकातील गुणवैशिष्ट्यामध्ये भर घालत हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेले नीलकंठत्व आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकाचे हाती धरलेले कपाल या भगवान शंकरांच्या दोन गुणवैशिष्ट्यांचे वर्णन त्याच शैलीत आचार्यश्री करतात.
हे नसेल तर तो देवच नाही यातून त्यांच्या अविभाज्य लक्षणांचे वर्णन केले. कारण यांच्याशिवाय भगवान शंकरांचे स्वरूप पूर्ण होत नाही. तसेच या गोष्टी भगवान शंकरां शिवाय अन्य कोणतीच देवता बाळगतही नाही.
त्यामुळेच या गोष्टींचे आणि याशिवाय मी देवाला मानत नाही या उच्चारातून आचार्य श्री स्वतःच्या एकनिष्ठेची घोषणा करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply