महादेव शंभो गिरीश त्रिशूलिंस्त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् |
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३६ ‖
भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही विचार करीत नाही तशी पूर्ण समर्पित वृत्ती भक्तीच्या क्षेत्रात अभिप्रेत असते.
आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात तेच वर्णन सादर करीत आहेत. त्यांची शब्दकळा आहे,
महादेव – हे महादेवा ! आपण सर्व देवांचे ही देव आहात.
शंभो – हे शंभो आपण सर्वांचे कल्याण करणारे आहात.
गिरीश-हे गिरिजापती ! त्रिशूलि: – हे त्रिशूलधारी ! या त्रिशुला च्या स्वरूपात आपण सत्व,रज,तम या तीनही गुणांचे संचालक आहात.
त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् – आपल्याच अधिष्ठानावर हे संपूर्ण विश्व प्रकाशित होत आहे. त्यात आपल्या चैतन्याचे प्रतिबिंब विलसत आहे.
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने- भगवान शंकरांना सोडूनी अन्य कोणतेही दैवत जाणत नाही.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् – मी शिव आहे.मी शिव आहे.मी शिव आहे.
हा शेवटचा उल्लेख फार महत्वाचा आहे. केवळ भगवान कसे आहेत? याचे वर्णन करून उपयोग नाही. त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी मी देखील तसाच असायला हवे. मी स्वतःला भगवंता पेक्षा वेगळा समजत असेल तर ईश्वरीय परमानंदाची प्राप्ती मला कदापि होणार नाही. मी त्याच ईश्वरी शक्तीचा अंश आहे ही वास्तव अनुभूतीच सर्व साधनेचे ध्येय आहे.
आचार्यश्री स्वतःच्या त्या भूमिकेचे वर्णन करून आपल्याला त्यासाठी प्रेरणा देत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply