किरीटे निशेशो ललाटे हुताशो
भुजे भोगिराजो गले कालिमा च |
तनौ कामिनी यस्य तत्तुल्यदेवं
न जाने न जाने न जाने न जाने ‖ ३८ ‖
विवेचनाच्या ओघात शिवोऽहम् ही आत्म स्वरूपाची जाणीव झाली आणि क्षणात समाधिस्थ झालेले आचार्य त्या अनुभूतीचे वर्णन करून गेले.
प्रारब्धवशात पुनश्च देह भानावर आले. जसा झोपेतून उठलेला माणूस झोपण्यापूर्वीच्या विचारांना पुन्हा प्राप्त होतो तसे आचार्यश्री पुन्हा स्तोत्रातील सुरू असलेल्या विषयावर आले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन श्लोका पूर्वीची रचना पहावयास मिळते.
पुनरुक्ती चे हे कारण पाहिले म्हणजे हे वर्णन योग्य वाटते. आचार्यश्री म्हणतात,
किरीटे निशेशो – ज्यांनी मस्तकावर निशेचा म्हणजे रात्रीचा ईश म्हणजे स्वामी असणारा चंद्र धारण केलेला आहे,
मस्तकावर चंद्र असणे हे मस्तकाच्या अर्थात विचारांच्या उज्ज्वलतेचे आणि शीतलतेचे प्रतीक आहे. भगवान भालचंद्र शंकर या स्वरूपातील आहेत.
ललाटे हुताशो- ज्यांच्या कपाळावर असणाऱ्या तृतीय नेत्रामध्ये विश्व विनाशकारी अग्नी विराजित आहे,
भुजे भोगिराजो – ज्यांच्या हातावर वासुकी तक्षक इत्यादी सर्प रुळत आहेत,
गले कालिमा च – ज्यांच्या कंठात हलाहल विष धारण केले असल्याने ज्यांचा गळा काळा पडलेला आहे.
दुसरा सुंदरतम अर्थ म्हणजे ज्यांच्या कंठातून कायम राम नामाचा उच्चार निघतो त्या रामाच्या घनश्याम अशा रंगाचा ज्यांचा गळा झालेला आहे,
तनौ कामिनी यस्य – ज्यांच्या अंगावर म्हणजे मांडीवर देवी पार्वती विराजमान आहे,
तत्तुल्यदेवं – त्यांच्यासारखा अन्य कोणीही देव,
न जाने न जाने न जाने न जाने – मी जाणत नाही. मी जाणत नाही. मी जाणत नाही .मी जाणत नाही.
शेवटी चार वेळा सांगणे याचा अर्थ अगदी ठासून सांगणे असा आहे. यात कोणतीच शंका नाही असे निर्विवाद कथन आहे.
उपासना करतांना आपली उपास्य दैवत हेच परमश्रेष्ठ तत्व आहे ही साधकाची भूमिका अनिवार्य असते. त्या भूमिकेला सुदृढ करण्यासाठी आचार्यांचे हे वर्णन आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply