शिवेशानतत्पूरुषाघोरवामादिभिः
पंचभिर्हृन्मुखैः षड्भिरंगैः |
अनौपम्य षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं
परं त्वां कथं वेत्ति को वा ‖ ४ ‖
भगवान श्रीशंकरांच्या अगम्यतेचे वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
शिवेशानतत्पुरुषाघोरवामादिभिः
पंचभिर्हृन्मुखैः- शिव, ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव या पाच प्रसन्न मुखांनी.
येथे भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाचे वर्णन आले आहे. यातील शिव किंवा ज्याला सद्योजात असेही नाव आहे ते जलतत्वाचे, ईशान हे पृथ्वी तत्त्वाचे, तत्पुरुष हे अग्नी तत्वाचे, अघोर हे आकाश तत्वाचे तर वामदेव हे वायू तत्वाचे प्रतिक आहे. त्या पंचमहाभूतांच्या रूपात भगवान प्रगट होत असल्याने यांना मुख म्हटले आहे.
षड्भिरंगैः – सहा अंगांनी.
वेदांची सहा अंगे आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण , निरुक्त, ज्योतिष आणि छंद.
या सहा अंगांनी अध्ययन केल्यावर वेदांचा अर्थ कळतो. भगवान या सगळ्यांच्या पार आहे.
अनौपम्य- अनुपमेय. ज्यांना कशाचीच उपमा देता येत नाही असे.
षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं- छत्तीस तत्व विद्यांच्या पार असणारे.
शैव सिद्धांतामध्ये असणाऱ्या तंत्रांतर पटल या आगम ग्रंथात, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिय, यासह मन, बुद्धी ,अहंकार, शिव,शक्ती, सदाशिव, ईश्वर, विद्या, माया, अविद्या, कला, राग, काल, नियती,जीव आणि प्रकृती अशा छत्तीस तत्वविद्यांचे वर्णन आहे.
परं – या सगळ्यांच्या पार असणाऱ्या,
त्वां कथं वेत्ति को वा – आपणास कसे आणि कोण जाणू शकेल?
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply