भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं
भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् |
नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या
सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖
या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात,
भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे,
अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना अकल्प असे म्हटले. अर्थात त्यांना विनाश नाही.
शंभो – हे भगवान शंकरा ! कल्याणकारका !
मयैवं – मी अशा प्रकारे
भुजंगप्रयातेन वृत्तेन – भुजंगप्रयात या वृत्तामध्ये, एखादा वळवळणारा नागराज पुढे जात असताना त्याची गती ज्या प्रकारची असते त्याप्रकारची लय या वृत्तात असल्याने याला भुजंगप्रयात असे म्हणतात.
क्लृप्तम् – आपले स्तवन रचलेली आहे.
नरः – जो कोणी मानव, स्तोत्रमेतत् – या स्तोत्र रचनेला,
पठित्वोरुभक्त्या – दृढ भक्तीने पठन करील,
सुपुत्र – सद्गुणसंपन्न संतती, सातत्यपूर्ण वंशपरंपरा,
आयु: – प्रदीर्घ आयुष्य,
आरोग्यम् – निरोगी जीवन, जो वेगळ्या आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. याच्याशिवाय अन्य निरर्थक आहे.
ऐश्वर्यम् – विविध प्रकारचे ऐश्वर्य.
एति – प्राप्त करेल.
या एति शब्दामध्ये या सर्व गोष्टींसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागणार नाहीत तर या सर्व गोष्टी भगवान श्री शंकरांचा कृपेने, आपोआपच त्यांच्याकडे चालत येतील असा सुंदर भाव आहे.
अर्थात या स्तोत्राच्या पठनाने त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतील.
त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल.
जय भोलेनाथ !
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply