प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं
मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् |
गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः
स्मरामि स्मरापत्तिसंपत्तिहेतोः ‖ ५ ‖
निर्माण आणि प्रलय दोन्हींची नियामक महाशक्ती आहेत भगवान शंकर. त्यांचे सदाशिव रूप निर्माणाचे अधिष्ठान आहे तर रुद्र हे विनाशाचे संचालक.
या दोन्हींच्या समन्वयातून साकारलेल्या भगवान शंकरांचे स्वरूप सांगतांना आचार्यश्री म्हणतात,
प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं- प्रवाळ म्हणजे पोवळे नावाचे रत्न. त्याचा प्रवाह म्हणजे त्यातून बाहेर पडणारे तेज. त्याची प्रभा म्हणजे चमक. त्याप्रमाणे शोण म्हणजे लालरंगाचे. अर्ध म्हणजे ज्यांचे अर्धे शरीर आहे असे.
मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् -मरुत्वन्मणि म्हणजे इंद्रनील मण्याच्या श्रीमहः- तेजा प्रमाणे
श्याममर्धम्- अर्धे शरीर निळसर काळपट असे सावळे आहे.
यातील पोवळ्याच्या लालीमे चा रंग आदिशक्तीचे प्रतीक असून भस्मधारण केल्याने निळसर धूसर दिसणारे शरीर भगवान शंकरांचे आहे. अर्धनारीश्वर स्वरूपात हे दोन्ही रंग एकवटतात.
गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः- शैववपु म्हणजे भगवान शंकरांच्या शरीरात हे दोन गुण स्यूत अर्थात एकत्र आलेले आहेत.
स्मरापत्तिसंपत्तिहेतोः – स्मर म्हणजे मदन त्याच्यावरची आपत्ती म्हणजे त्याचा विनाश आणि त्याची संपत्ती म्हणजे निर्मिती, या दोन्हींचा आधार असणारे.
शक्ती स्वरूपात, प्रकृती स्वरूपात विश्वाची निर्मिती आणि शंकर स्वरूपात विलय या दोन्हींचे एकत्रित स्वरूप असणाऱ्या अर्धनारीश्वराचे मी स्मरण करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply