बाल्ये दुःखातिरेको मललुलितवपुः स्तन्यपाने पिपासा
नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मां तुदन्ति ।
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः शड्करं ना स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥२॥
पूर्वजन्मीच्या कर्मांच्या फलवशात गर्भवास प्राप्त झाला. आरंभीच्या श्लोकात त्याचे वर्णन केल्यानंतर आचार्यश्री पुढे म्हणतात की जन्म प्राप्त झाल्यानंतर देखील ही दुःख परंपरा सुटली नाही.
शैशवावस्थेतील दुःखांचा विचार मांडताना आचार्यश्री म्हणतात,
बाल्ये दुःखातिरेको – बालपणात मला अनेक दुःखदायक गोष्टींचा सामना करावा लागला. मललुलितवपुः- माझे शरीर मलाने व्याप्त होते. स्वतःचे मलमूत्र देखील स्वच्छ करता येत नव्हते. मी त्यातच लोळत होतो. आजूबाजूला इतर घाण असली तरी त्यातच लोळावे लागत होते. सरकण्याची देखील क्षमता नव्हती.
स्तन्यपाने पिपासा – सातत्याने स्तनपानाची तृष्णा जागृत होत होती. अर्थात तहान भुकेच्या वेदना त्रस्त करीत होत्या.
नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो- शरीराच्या अवयवांची मध्ये कोणत्याच प्रकारची शक्ती नव्हती. सर्वच बाबतीत पराधीनतेचे दुःख होते. भवगुणजनिता
जन्तवो मां तुदन्ति –
या संसारात जन्माला येणारे विविध जीव-जंतू मला तोडत होते. डास मुंग्या चावत होत्या. त्यांना हाकलण्याचीदेखील ताकद नव्हती.
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः – नानाविध रोगांनी आणि दुःखांनी परवश झालेला मी केवळ रडत होतो.
शड्करं ना स्मरामि- हे भगवान शंकराच्या वेळी मला आपले स्मरण देखील करता येत नव्हते.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो – हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या अपराधांना क्षमा करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply