प्रौढोहं यौवनस्थौ विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्
धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः ।
शैवीचिन्ताविहीनं मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥३॥
मानवी जीवनातील दुःख परंपरेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात की काळाच्या ओघात मी मोठा झालो. बालपणीच्या दुःख कारणांना दूर करण्याचे बळ तर अंगी आले पण तरी दुःख कुठे संपले? तारुण्यात वेगळे दुःख सुरू झाले.
प्रौढोहं यौवनस्थौ – मी थोडा मोठा झाल्यावर यौवन अवस्थेला प्राप्त झालो.
विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ
दष्टो – त्यावेळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयरूपी विषधर म्हणजे सापांनी माझ्या मर्म स्थानांना चावा घेतला.
त्या पाच विषयांचा आस्वाद घेणारी अनुक्रमे कान,त्वचा, डोळे, जीभ आणि नासिका ही पाचही इंद्रिये त्याविषयांच्याच ताब्यात गेली होती. जणु त्यांच्या विषाने बेशुद्ध झाली होती.
नष्टो विवेकः – त्याचा परिणाम म्हणून माझा विवेक नष्ट झाला. काय करावे? आणि काय करू नये? हेच समजत नव्हते. सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः – मुलगा, पैसा, पत्नी यांच्या गोड गोड वाटणाऱ्या सुखात मी आकंठ बुडून गेलो.
शैवीचिन्ताविहीनं – भगवान शंकरांचे चिंतन करण्याचे सोडून,
मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं- माझे हृदय मानसन्मान गर्व यांच्या टोकावर आरूढ झाले होते.
हे सर्व माझे दोष आहेत.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो – हे भगवान महादेवा ! शिवशंकरा! माझ्या या अपराधांना क्षमा करा.
मला आपले चिंतन करण्याची बुद्धी प्रदान करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply