दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितं नैव लिड्गं
नो लिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः ।
धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥६॥
भगवान श्री शंकरांच्या पूजनाचा विषय निघाल्यानंतर या पूजेमध्ये अर्पण करण्याच्या पुढील पदार्थांची आचार्यश्री ना स्वाभाविक आठवण झाली. या उपचारांचा देखील मी कधी विनियोग केला नाही. अशी कबुली देत त्यासाठी क्षमा मागताना आचार्यश्री म्हणतात,
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः – दूध,मध, आज्य म्हणजे तूप यांनी युक्त असलेल्या दही आणि साखर सह, अर्थात पंचामृताने,
स्नापितं नैव लिड्गं – मी कधीही शिवलिंगाला स्नान घातले नाही.
नो लिप्तं चन्दनाद्यैः- त्या भगवान शंकरांच्या प्रतीक शिवलिंगावर कधी चंदन इत्यादींचा लेप लावला नाही. कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः – कधी सोने इत्यादींनी सजविलेल्या फुलांनी, अर्थात फुले किंवा आभूषणांनी,
धूपैः- ऊद इ. धूपांनी, कर्पूरदीपै – कापूर आरती इत्यादींनी कधी भगवंता तुझी पूजा केली नाही.
र्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः – विविध रसांनी युक्त असणारे भक्ष इत्यादी नैवेद्य समर्पित केले नाही.
नैवेद्यात मधुर, आम्ल,लवण,कटू, कशाय आणि तिक्त हे
सहा रस असावेत आणि भक्ष्य म्हणजे खाता येणारे, लेह्य म्हणजे चाटता येणारे, पेय म्हणजे पिता येणारे आणि चोष्य म्हणजे चोखता येणारे अशा चार प्रकारचे अन्न असावे असे वर्णन आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो – हे श्री महादेव शंभो माझ्या या अपराधांना क्षमा करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply