नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहनप्रत्यवायाकुलाख्यं
श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गानुसारे ।
तत्वऽज्ञाते विचारैः श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥७॥
आपल्या ठिकाणी उपासनेशी संबंधित कोणतीही पात्रता नाही अशा स्वरूपात पूज्यपाद आचार्यश्री आपल्या अज्ञानाचे भगवंताच्या चरणाशी प्रदर्शन करीत आहेत.
वेगवेगळ्या शास्त्र ग्रंथात उपासनेचे नियम सांगितलेले असतात त्यांना श्रुती प्रतिपादित म्हणजे श्रौत तर स्मृती प्रतिपादित म्हणजे स्मार्त कर्म असे म्हणतात.
आचार्य श्री प्रथम चरणात म्हणतात,
नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहनप्रत्यवायाकुलाख्यं – एखाद्या घरंदाज अर्थात परंपरेने युक्त असणाऱ्या पंडितालाच कळावे अशा प्रत्येक पदाच्या कठीण अर्थांनी भरलेल्या स्मार्त कर्माची मला शक्यता नाही. मला त्यांचा अर्थ कळत नाही.
श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गानुसारे – मग पंडितांच्या वंशपरंपरेत ब्रह्म मार्गानुसार केल्या जाणाऱ्या श्रौत कर्माची तर गोष्टच कुठे? तो तर आणखीन पलीकडचा मार्ग. आणखीनच कठीण.
तत्वऽज्ञाते विचारैः श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं – खूप विचारपूर्वक अर्थात प्रयत्नपूर्वक जरी मी श्रवण मनन केले तरी मला त्या ग्रंथातील तत्त्व अज्ञातच राहते. मग श्रवण मननच शक्य नाही तर पुढील निदिध्यासन कसे जमणार? ते तर असंभव आहे.
श्रवण,मनन आणि निधिध्यासन अशी तीन स्तरीय रचना असते. श्रवण या शब्दाचा अर्थ श्रीगुरुंनी, ग्रंथांनी सांगितलेले यथायोग्य स्वरूपात ऐकणे. मनन शब्दाचा अर्थ आहे त्यावर शांतपणे विचार करून तो विचार सर्वार्थाने अंगीकारणे. तरी निधिध्यासन शब्दाचा अर्थ त्या विचारानुसार आचरण करणे. जर श्रवण मननच नीट झाले नाही तर आचरण होणारच कसे? अशी स्वतःची अगतिकता आचार्य येथे सादर करीत आहेत. वास्तविक ती आपली अवस्था आहे. आपल्याला ती सांगता सुद्धा येत नाही त्यामुळे आपल्या वतीने आचार्य सांगत आहेत.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो – हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या शास्त्र अज्ञानरूपी अपराधांना क्षमा करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply