ध्यात्वा चित्ते शिवाख्यं प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो
हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः ।
नो तप्तं गाड्गतीरे व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥८॥
आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे मी काय काय केले नाही यांची सूची देण्याच्या निमित्ताने खरेतर आचार्यश्री आपण काय काय करायला पाहिजे ते सांगत आहेत.
त्या सूचीत ते पुढे म्हणतात,
ध्यात्वा चित्ते शिवाख्यं – मनामध्ये भगवान शंकरांचे नामस्मरण करीत करीत,
प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो – मी कधी ब्राह्मणांना भरपूर धन दिले नाही. अर्थात कधीही सत्पात्री दान केले नाही.
हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः – मी कधीही बीज मंत्रांनी लाखोच्या संख्येत अग्नीमध्ये आहुत्या दिल्या नाहीत.
यात बीज मंत्र म्हणतांना सर्वात लहान संख्येचा मंत्र असा भाव आहेत. तोदेखील कधी केला नाही. अर्थात तो दहा वीस वेळा किंवा एखादी माळ करून उपयोग नाही हे सांगण्याकरता आचार्य श्री लाखोच्या संख्येचा विचार करतात. किंवा मी इतके भव्यदिव्य विधान केले नाही. असा देखील अर्थ.
नो तप्तं गाड्गतीरे – मी कधीही गंगा नदीच्या तीरावर तप केले नाही. व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः – व्रत,जप इत्यादींची संबंधित नियमांचे पालन करून ना कधी रुद्र जप केला, ना कधी वेदांचा अभ्यास.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो – हे भगवान महादेव शंकरा ! यापैकी काहीही न करता आयुष्य वृत्ता घालवले या अपराधाकरिता मला क्षमा करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply