हृद्यं वेदांतवेद्यं हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् !
सत्यं शांतस्वरूपं सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् !!
जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ त्रिगुणविरहितं शङ्करं न स्मरामि !
क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो !! ११!!
या स्तोत्राच्या अनेक आवृत्तीमध्ये प्रस्तुत श्लोक उपलब्ध नाही. मात्र कांची कामकोटि पीठाद्वारे प्रकाशित स्तोत्रावली मध्ये समाविष्ट असलेला हा अत्यंत सुंदर श्लोक.
जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
हृद्यं – अत्यंत मनोहारी असणाऱ्या,
वेदांतवेद्यं – वेदांत सारखा उपनिषदांमध्ये प्रतिपादित तत्वज्ञानाच्या द्वारे ज्यांची जाणीव होते असे,
हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् – ज्यांच्या कृपा स्वरूपात हृदय कमला मध्ये भक्तीची दिव्य ज्योत प्रज्वलित होते असे,
सत्यं – भूत, भविष्य वर्तमान या तीनही काळांच्या अतीत असणारे, परम सत्य,
शांतस्वरूपं- काहीच मिळवायचे नसल्याने परमशांत असणारे, सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् – सगळ्या ऋषीमुनींच्या हृदय कमलरुपी समर्पणानेच जाळता येणारे,
जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ- जागृती, स्वप्न व सुषुप्ति म्हणजे गाढ निद्रा या माझ्या तीनही अवस्थांमध्ये,
त्रिगुणविरहितं – तीनही गुणांनी रहित असणाऱ्या,
शङ्करं न स्मरामि – भगवान शंकरांचे मी कधीही स्मरण केले नाही.
येथे आचार्यश्री सांगत आहेत की जीव हा तीन अवस्थांमध्ये सारखा तीन गुणांनी युक्त आहे. तर भगवान त्रिगुणातीत आहे. तीन गुणांमुळे प्राप्त होणाऱ्या सकल समस्यांच्या निराकरणासाठी स्थान एकच त्रिगुणातीत भगवान शंकरांची चरणकमले.
पण जीव त्यांचे स्मरण करीत नाही.
क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो – हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या अपराधा करित मला क्षमा करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply