चन्द्रोदभासितशेखरे स्मरहरे गड्गाधरे शंकरे सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे ।
दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः ॥१२॥
भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाला आपल्या समोर ठेवताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात,
चन्द्रोदभासितशेखरे – मस्तकावरील चंद्रामुळे ज्यांचा शिरोप्रदेश उजळून निघाला आहे असे. मस्तकावरील चंद्र हे वेगळ्या अर्थाने मस्तकाच्या उज्ज्वलतेचे, शांततेचे, प्रसन्नतेचे, शीतलतेचे प्रतीक.
स्मरहरे – स्मर म्हणजे भगवान मदन. श्रीशंकरांनी मतदानाचे दहन केल्यामुळे त्यांना स्मरहर म्हटले आहे.
गड्गाधरे – मस्तकावर गंगा धारण करून संपूर्ण जगाच्या पावनतेची धुरा ज्यांनी आपल्या मस्तकावर घेतली आहे असे,
शंकरे – शम् म्हणजे कल्याण. संपूर्ण विश्वाचे कल्याण करतात ते भगवान शंकर. सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे – ज्यांनी गळ्यात मोत्यांच्या माळांप्रमाणे आणि कानात कुंडलां प्रमाणे सर्प धारण केले आहेत असे.
नेत्रोत्थवैश्वानरे – ज्यांच्या तृतीय नेत्रातून विश्व विनाशकारी प्रलयाग्नी प्रगट होतो असे,
दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे – दंती म्हणजे हत्ती. त्याची त्वचा म्हणजे कातडे ज्यांनी वस्त्र प्रमाणे गुंडाळले आहे असे. गजासुर नावाच्या राक्षसाला सोबत झालेल्या संग्रामाचा इथे संदर्भ आहे.
त्रैलोक्यसारे- संपूर्ण त्रैलोक्याचे सार असणाऱ्या,
हरे- भक्तांची दुःखे दूर करणाऱ्या,
मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः – हे भगवान शंकरा ! माझ्या मोक्षासाठी कारणीभूत ठरणारी माझी वृत्ती निर्मल करा. अन्य स्तवनाचा अर्थात मागणीचा उद्देश तो काय?
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply