आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥
या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात,
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं – पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे म्हणजे ईश्वरी सेवेची एक संधी नष्ट होणे आहे. वाढत्या वयासोबत ही जाणीव वाढली नाही, तर वाढ नेमकी कशाची?
याति क्षयं यौवनं- तारुण्य लयाला जात आहे. पर्यायाने क्षमता नष्ट होत आहेत.
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः – एकदा गेलेला दिवस कधीही परत येत नाही. शेवटी पश्चातापच करावा लागेल.
कालो जगदभक्षकः – काळ हा संपूर्ण विश्वाचे भक्षण करणारा आहे. त्याच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. आपणही सुटण्याची शक्यता नाही.
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला – ज्या पैशाच्या आधारावर आपण स्वतःला सुरक्षित समजतो तो पैसा पाण्यावरच्या तरंगा प्रमाणे चंचल आहे. कधी, कुठून आणि कसा निघून जाईल सांगता येत नाही. या जगातील मोठमोठी साम्राज्ये, राजसत्ता नष्ट झाल्या मग माझ्या पैशाचा पाड तो किती?
विद्युच्चलं जीवितं – विजे प्रमाणे जीवन चपल आहे. विजे प्रमाणेच त्याला धरून ठेवता येत नाही. अनेकदा ते धक्केच देते.
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना – त्यामुळे शरण आलेल्या माझे, हे शरण देणाऱ्या भगवंता आता आपणच रक्षण करा.
या जगात आपल्या शिवाय सर्व नश्वर आहे. त्यामुळे मी आपल्याला शरण आलो आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply