हे पार्वतीहृदयवल्लभ – हे संबोधन मोठे मजेदार आहे. यातील हृदयवल्लभ शब्द पार्वतीसह वापरला तर पार्वती च्या हृदयाला अत्यंत प्रिय असणारे असा अर्थ होतो आणि पार्वती आणि हृदयवल्लभ हे शब्द वेगळे केले तर ज्यांच्या हृदयाला पार्वती अत्यंत प्रिय आहे असा अर्थ होतो. दोघांच्याही परस्पर प्रियतेचा विचार आचार्य एकाच शब्दात मांडतात.
चन्द्रमौले – ज्यांनी मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे,
भूताधिप – भूत शब्दाचा अर्थ जे जे निर्माण झाले ते. या संपूर्ण चराचर विश्वाचे अधिपती.
प्रमथनाथ – प्रमथ म्हणजे घुसळून काढणारा. लक्ष्यार्थाने भगवान मदन. त्यांचे स्वामी.
गिरीशचाप – पर्वतराज हिमालयालाच धनुष्य करणारे. अर्थात बसल्या जागेवरूनच आपले कार्य करू शकणारे.
हे वामदेव – वाम म्हणजे सुंदर. सगळ्यात सुंदर देवता असा एक अर्थ.
वाम शब्दाचा दुसरा अर्थ आहे डावा. डावा हा शब्द गौण या अर्थाने वापरतात. जे आपल्या सौंदर्याने, शक्तीने, महात्म्याने, परम वैभवाने, सर्व देवतांना डावे करतात, गौण ठरवतात ते वामदेव
भव – निर्माण झालेल्या सर्व चराचर विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या रूपात स्वतः प्रकट झालेले.
रुद्र – भगवान ब्रह्मदेवांच्या पुत्र रूपात घेतलेल्या अवतारात भगवान शंकर रडत प्रकट झाले. त्या रोदना मुळे त्यांना रुद्र असे म्हणतात.
पिनाकपाणे – भगवान शंकरांच्या धनुष्याला पिनाक असे नाव आहे.
पाणि शब्दाचा अर्थ आहे हात. (या शब्दात इकार ऱ्हस्व असतो. दीर्घ केला तर त्याचा अर्थ पाणी म्हणजे जल असा होतो.)
हातात पिनाक नावाचे धनुष्य धारण करणारे.
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष – हे भगवान शंकरा ! माझे या गहन संसार दुःखातून रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply