हे नीलकण्ठ वृषभध्वज पञ्चवक्त्र
लोकेश शेषवलय प्रमथेश शर्व ।
हे धूर्जटे पशुपते गिरिजापते मां
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ ३ ॥
भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात,
हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे.
वृषभध्वज – वृषभ हे धर्माचे प्रतीक आहे. भगवान शंकरांच्या ध्वजावर वृषभ काढलेला असतो. अर्थात ते जेथे असतात तेथे धर्म असतो. जेथे धर्म असतो तेथेच ते राहतात.
पञ्चवक्त्र – ज्यांना पाच मुखे आहेत असे,
चार दिशांना असणारी चार मुखे सर्वत्र घडणाऱ्या घटनांची जाणीव असणे याचे प्रतीक असतात. तर भगवान शंकरांचे पाचवे मस्तक हे बाहेरच्या चार दिशांना सोडून आत पाहणाऱ्या अंतर्ज्ञानाचे, आत्मज्ञानाचे प्रतीक असते.
लोकेश – लोक शब्द एक वचनात वापरला स्वर्ग,मृत्यु,पाताळ अशा लोकांचा द्योतक असतो. तर बहुवचनात वापरला तर त्याचे अर्थ सर्व लोक म्हणजे माणसे असा होतो. या सगळ्यांचे पालक.
शेषवलय – ज्यांच्या गळ्यात, हातात सर्पांनी गुंडाळी मारली आहे असे.
प्रमथेश- मनाचे चालक. त्यामध्ये सर्वाधिक मथन म्हणजे घुसळण चालते म्हणून मनाला प्रमथ असे म्हणतात.
शर्व – हा शब्द संस्कृत च्या शृ धातूपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ हिंसा करणे असा होतो. भक्तांच्या सकल दु:खांना नष्ट करणारे ते शर्व.
हे धूर्जटे – ज्यांनी मस्तकावर जटा धारण केल्या आहेत असे.
पशुपते – सकल जीवांचे संचालक,
गिरिजापते – देवी पार्वतीचे पती.
असणाऱ्या हे भगवान शंकरा !
मां
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष – या संसाराच्या गहन दुःखातून हे जगदीश्वरा ! मला सांभाळा. माझे रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply