हे विश्वनाथ शिव शंकर देवदेव
गङ्गाधर प्रमथनायक नन्दिकेश ।
बाणेश्वरान्धकरिपो हर लोकनाथ
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ ४ ॥
श्री शिवस्तुती कारक नामावली मध्ये जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात,
हे विश्वनाथ – विश्व शब्दाचा अर्थ आहे पसरलेले. या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पसाऱ्याचे स्वामी असल्यामुळे भगवंताला विश्वनाथ असे म्हणतात.
शिव – शिव शब्दाचा अर्थ पवित्र. कोणतेही पात्र किंवा त्यातील जल अपवित्र असू शकते. मात्र त्या अपवित्र जलात देखील पडलेले प्रतिबिंब शुद्धच असते. तसे सर्व जीव मात्रांच्या अंतरंगी परमशुद्ध चैतन्यरूपात भगवान क्रीडा करीत असल्याने त्यांना शिव असे म्हणतात. ते शिव चैतन्य देहापासून विलग झाले की देहाला म्हटले जाते.
शंकर – शम् म्हणजे कल्याण. सगळ्यांचे कल्याण करतात ते भगवान शंकर.
देवदेव- जेथे दिव्यत्व असते त्या स्वरूपाला देव असे म्हणतात. अशा सगळ्या देवांचेही देव.
गङ्गाधर – ज्यांनी आपल्या मस्तकावर गंगा धारण केली आहे असे.
प्रमथनायक – सगळ्या प्राणिमात्रांच्या मनाचे संचालक.
नन्दिकेश – नंदी हे एका आणि धर्माचे तर दुसऱ्या मनाचे प्रतीक आहे. या दोन्हींचे स्वामी.
बाणेश्वरान्धकरिपो – भगवान शंकरांनी आपल्या विनाशलीले मध्ये बाणासुर, अंधकासुर अशा विविध राक्षसांचा विनाश केला आहे. त्या कथांचा विचार करता त्यांचे रिपू म्हणजे शत्रू.
हर लोकनाथ
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष – हे लोक नाथा ! माझे हे संसाररूपी गहन दुःख दूर कर. माझे रक्षण कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply