वाराणसीपुरपते मणिकर्णिकेश
वीरेश दक्षमखकाल विभो गणेश ।
सर्वज्ञ सर्वहृदयैकनिवास नाथ
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ ५ ॥
भगवान शंकरांच्या आणखी काही नावांनी त्यांचे गुणगान करणारे आचार्यश्री म्हणतात,
वाराणसीपुरपते – वारणा आणि असी अशा दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या क्षेत्राला वाराणसी असे म्हणतात. त्या श्री क्षेत्र काशी ची देवता आहे भगवान श्री विश्वनाथ.
मणिकर्णिकेश – काशीमध्ये वाहणाऱ्या देवी गंगेला मणिकर्णिका असे म्हणतात. त्या गंगेचे उपास्य स्थान असणारे ते मणिकर्णिकेश.
हा मनकर्णिका घाट काशी मधील सर्वात प्राचीन घाट म्हटला जातो. येथे काशीतील महान स्मशान आहे. येथील चितेचे भस्म श्री विश्वनाथाला समर्पित केले जाते. त्या स्मशानात निवास करणारे.
वीरेश – अद्वितीय पराक्रमी. दक्ष यज्ञाच्या विनाशासाठी वीरभद्र रूपामध्ये प्रकट झालेले.
दक्षमखकाल – दक्ष प्रजापती नामक प्रजापतीच्या राजाने केलेला मख म्हणजे यज्ञ, त्या यज्ञात भगवान शंकरांची प्रथम पत्नी, दक्षकन्या सतीने स्वतःला जाळून घेतल्यामुळे, भगवान शंकरांनी नष्ट केला. या कथेचा संदर्भ घेत या यज्ञाचा काळ अर्थात विनाशक. विभो – विभू शब्दाचा अर्थ आहे व्यापक.
गणेश – देवता रूपी सर्व गणांचे अधिपती.
सर्वज्ञ – भूत, भविष्य, वर्तमान अशा तीनही काळात घडणाऱ्या सर्व घटनांचे साक्षी. सर्वहृदयैकनिवास – सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणारे, चालक चैतन्य.
नाथ – हे माझ्या स्वामी,
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष – जगदीश्वरा ! या संसाररूपी गहन दुःखातून माझे रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply