श्रीमन् महेश्वर कृपामय भो दयालो
हे व्योमकेश शितिकण्ठ गणाधिनाथ ।
भस्माङ्गराग नृकपालकलापमाल
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ ६ ॥
भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
श्रीमन् – श्री म्हणजे लक्ष्मी, वैभव. भगवान शंकरांचा निवास असणारा कैलास लोक ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ वैभवसंपन्न स्थान म्हणून वर्णिला आहे. त्याने युक्त ते श्रीमान.
महेश्वर – सगळ्यात ईश्वरांचे देखील ईश्वर म्हणून महेश्वर.
कृपामय – भक्तांच्या बद्दल त्यांच्या मनात कृपेचा अपार सागर भरलेला आहे असे,
भो दयालो – अत्यंत दयापूर्ण रीतीने जे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
हे व्योमकेश – व्योम म्हणजे आकाश. तेच ज्यांचे केस आहे असे. अर्थात परम व्यापक.
शितिकण्ठ – ज्यांच्या गळ्याच्या भोवताली सर्प गुंडाळलेला असल्यामुळे तो थंड झालेला आहे असे. गणाधिनाथ – नंदी, भृंगी,शृंगी, पुष्पदंत इ. समस्त शिवगणांचे स्वामी.
भस्माङ्गराग – सर्वांगावर विभूतीचे सौंदर्य धारण करणारे.
सामान्य पदार्थ जाळले तर त्याची राख होते पण यज्ञात समर्पित केलेल्या गोष्टींचे भस्म होते. साधकांच्या जीवन यज्ञाचे भस्म भगवान धारण करतात.
नृकपालकलापमाल – नृक म्हणजे मनुष्य. त्या सगळ्यांचे पालक ते नृकपालक. येथे हा शब्द भगवान ब्रह्मदेवां करिता वापरला आहे. त्या ब्रह्मादेवांनी सृष्टीच्या आरंभी ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगटलेल्या भगवान शंकरांचा आदी अंत मी जाणला असे असत्य कथन केले. ब्रह्मदेवांच्या मुळात पाच असणाऱ्या मस्तकां मधून
एक मस्तक, हे असत्य वचन निघाल्यामुळे श्रीशंकरांनी कापले असे पुराणात वर्णन आहे. त्या मस्तकाची माळ गळ्यात धारण करणारे.
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष- अशा हे भगवान महादेवा ! या गहन संसार रुपी दुःखातून माझे रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply