विश्वेश विश्वभवनाशक विश्वरूप
विश्वात्मक त्रिभुवनैकगुणाभिवेश ।
हे विश्वबन्धविनिवारण दीनबन्धो
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ ८ ॥
भगवान विश्वनाथाच्या विश्वव्यापक वैभवाचे विशेष वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
विश्वेश – या संपूर्ण चराचर ब्रह्मांडाचे अधिपती, या विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अंतिम नियंत्रण ठेवणारी परमश्रेष्ठ शक्ती. विश्वभवनाशक – या विश्वात भव म्हणजे उत्पन्न झालेल्या प्रत्येक गोष्टीचा शेवटी विनाश करणारे. प्रणय स्वरुपात या सगळ्याचा विलय करणारे.
विश्वरूप – या विश्वातील प्रत्येक घटकाच्या रूपामध्ये स्वतः नटलेले. पृथ्वी आप तेज वायू व आकाश ही पंचमहाभूते तथा सूर्य, चंद्र आणि यजमान म्हणजे जीव या आठ रूपात नटलेल्या भगवान शंकरांना अष्टतनुधारी शिव असे म्हणतात. त्याचा येथे संदर्भ आहे. या सगळ्यात नटले असल्यामुळे ते विश्वव्यापक आहेत.
विश्वात्मक- सगळ्या विश्वाला व्यापून असलेले चैतन्य. त्रिभुवनैकगुणाभिवेश – संपूर्ण त्रैलोक्यातील सर्व सद्गुणांचे अधिष्ठान असलेले.
हे विश्वबन्धविनिवारण – आपल्याला शरण आलेल्या आपल्या भक्तांना या संसाररूपी बंधनातुन सोडविणारे.
दीनबन्धो – ज्याला अन्य कोणाचाही आधार उरलेला नाही त्याला शास्त्र दीन असे म्हणते. अशा समस्त दीनांचे आप्तस्वकीय होऊन त्यांचे कल्याण करणारे. त्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करणारे.
अशा हे भगवान शंकरा !
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष – हे जगदिशा! या संसाररूपी गहन दुःखातून माझे रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply