श्री गणेश अवतारलीला ९ – श्री शूर्पकर्ण अवतार
श्री मुद्गल पुराणात अत्यंत मोजक्या वेळेसाठी झालेल्या गणेशांच्या अवतारांपैकी एक अवतार श्री शूर्पकर्ण अवतार.
धर्मघ्न नावाच्या राक्षसाच्या पोटी यज्ञहा नावाचा राक्षस झाला. धर्माचा नाश करतो तो धर्मघ्न. तर यज्ञाचा विनाश करतो तो यज्ञहा. ही केवळ नावे नाहीत तर प्रवृत्ती आहेत.
वास्तविक यज्ञ ही कल्पना वैज्ञानिक अंगाने समजून घेतली पाहिजे. समजा एखाद्या यज्ञकुंडात दोन-चार मिरच्या टाकल्या तर? सगळ्यांना ठसका लागेल ना? याचा अर्थ मिरची त्यांच्यापर्यंत पोहोचली ना? मग मला सांगा जर मिरची पोहोचते तर तूप पोहचत नसेल का? मिरची चा परिणाम तत्काळ दिसतो पण तुपाचा तसा दृश्य होणार नाही. पण म्हणून तो होत नाही असे कसे म्हणणार? यज्ञामध्ये समर्पित केलेल्या सर्व औषधी वनस्पतींच्या समिधां मध्ये असणारे औषधी गुणधर्म सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आहे यज्ञ.
अशा यज्ञांना नष्ट करतो तो यज्ञहा. या राक्षसाने त्रस्त झालेल्या देवांनी प्रार्थना केली आणि भगवान गणेश शूर्पकर्ण रूपात प्रकट झाले. या अवतारात त्यांनी राक्षसाशी चर्चा वगैरे केलेली नाही तर सरळ परशु उचलला आणि दोन तुकडे केले. जिज्ञासूंच्या शंकांचे समाधान संभव असते. कुतर्कांचे समाधान करता येत नाही.
या अवताराचे नाव मोठे सुंदर आहे. शूर्पकर्ण. येथे कान सुपासारखे, म्हणताना केवळ त्याच्या आकाराचा नव्हे तर गुणांचा विचार महत्त्वाचा आहे.
कोणताही पदार्थ सुपात घेतल्यावर जशा काडीकचरा धूळ उडून जाते, त्याप्रमाणे कानावर आलेल्या गोष्टींमधली फालतू गोष्ट फेकून देता येते त्याला शूर्पकर्ण म्हणतात.
आपल्या संस्कृतीतील यज्ञ इत्यादी गोष्टींबद्दलचा अपप्रचार उडवून लावतात ते श्रीशूर्पकर्ण.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply