मुंबईमधील अनेक गणपतींपैकी एक म्हणजे सध्या प्रख्यात असलेला प्रभादेवीजवळचा सिद्धिविनायक. लक्ष्मण विठू पटेल यांनी हे मंदिर १८०१ मध्ये बांधल्याचा कागदोपत्री पुरावा सापडतो. मूळचे मंदिर तसे लहान आहे. अक्कलकोटच्या महाराजांचे शिष्य रामकृष्ण जांभेकर यांनी गोविंदराव फाटक यांना मंदिराच्या देखभालीकरीता पाठविले. त्याप्रमाणे श्री फाटक यांनी बरेच कष्ट घेऊन येथील परिसराची सुधारणा केली. एकदा त्यांच्या मूळची काळ्या पाषाणाची असलेली मूर्ती रंगविण्याचे मनात आले. त्यानुसार त्यांनी आकर्षक स्वरूपात ही मूर्ती रंगविली. तेव्हापासून या मंदिरात बदल घडून आला. मंदिराची सध्याची वास्तू नव्याने बांधण्यात आली आहे. १९९४ साली श्रृंगेरी पीठाच्या जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते या नव्या वास्तूवर विधिवत कलश बसविण्यात आला.
मुंबईतील दादर भागातील सावरकर मार्गावर प्रभादेवी भागात हे गणेशस्थान आहे. साधारण दोनशे वर्षापूर्वीचे हे स्थान आहे. मूळ मंदिर फार लहान होते. मुंबईकरांच्या गणेशभक्तीमुळे या मंदिराचा परिसर आता खूपच वाढला आहे. मंदिराचा आतील गाभारा फक्त १५ बाय १५ फूटाचा आहे आणि बाहेरचा सभामंडप १२ बाय ३० फूटांचा होता. श्री. फाटक या गणेशभक्तामुळे गेल्या सुमारे १५ वर्षांमध्ये या मंदिराचा कायापालट होत गेला. देवळाला लागूनच पुजार्यांची राहण्याची व्यवस्था आता करण्यात आली आहे . देवळाच्या डाव्या बाजूला पुष्कळ मोठी जागा आहे. देवळासमोर तीन दगडी दीपमाळा आहेत. गणेशाची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे पण आता मूळच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीला रंग दिल्यामुळे ती वेगळीच दिसते. साधरणपणे तीन फूट उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मूर्तीला चार हात आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना ऋद्धि सिद्धी आहेत. मार्गशीर्ष, चैत्र, आणि भाद्रपद महिन्यात येथे मोठे उत्सव होतात. तथापि दर महिन्यात संकष्टी चतुर्थीला दर्शनासाठी येणार्या भक्तांच्या गर्दीमुळे या परिसरास जत्रेचेच स्वरूप येते.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply