कदंबवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं,
महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणींम् |
दया विभव कारिणी विशदरोचनाचारिणी,
त्रिलोचन कुटुम्बिनी त्रिपुर सुंदरी माश्रये ॥२||
परांबा त्रिपुरसुंदरीच्या अलौकिक वैभवाला विशद करताना आचार्यश्री म्हणतात,
कदंबवनवासिनीं- कदंब वृक्षाला स्वर्गीय वृक्ष, कल्पवृक्ष असे म्हणतात. अशा वृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी.
कल्पवृक्षाच्या वनातच निवास केल्यावर कोणतीही इच्छा क्षणात पूर्ण होणार. मग उरलेल्या वेळेचे करायचे काय? तर शास्त्र सांगते साहित्य संगीत आणि कलेमध्ये समय सत्कारणी लावावा. त्यानुसार, कनकवल्लकीधारिणीं- कनक अर्थात सोन्याची. वल्लकी अर्थात वीणा धारण करणारी.
महार्हमणिहारिणीं- महार्ह अर्थात अत्यंत सुयोग्य. मणि म्हणजे रत्न. हारिणी अर्थात अशा रत्नांच्या माळा धारण करणारी. मुखसमुल्लसद्वारुणींम् – मुखामध्ये आनंदाने वारुणी धारण करणारी. वारूणी शब्दाचा आपल्याला केवळ एकच अर्थ माहिती असतो.
वारुणी शब्दाचा दुसरा अर्थ आहे मध मिश्रित पाणी.
योगशास्त्रानुसार ब्रह्मरंघ्रामधून पाझरत असणाऱ्या अमृताला वारुणी असे म्हणतात. त्या दिव्यरसाने आत्मानंदात निमग्न.
दया विभव कारिणी- शरणागत भक्तांवर दया करणारी आणि त्यांना वैभव प्रदान करणारी.
विशदरोचनाचारिणी- विशद म्हणजे मोठ्या प्रमाणात, विशाल आकारात, रोचना म्हणजे कुंकुम धारण करणारी. भव्य तिलक धारिणी.
त्रिलोचन कुटुम्बिनी- भगवान शंकरांची पत्नी .
त्रिपुर सुंदरीमाश्रये- आई त्रिपुरसुंदरीला मी शरण जातो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply