कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया,
कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया |
मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ,
कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३||
श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी.
कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार मांडण्यासाठी आचार्यश्री कदंबवनचारिणीं, कदंबवनवासिनीं, कदंबवनशालया अशा शब्दात वारंवार आई आणि कदंब वृक्षाचा सहसंबंध अधोरेखित करीत आहेत. कुचभरोल्लसन्मालया-हृदय मंडलावर मोत्यांच्या विविध माला धारण केल्याने सुंदर दिसणारी.
कुचोपमितशैलया- पर्वताकार विशाल स्तनमंडल असणारी. गुरुकृपालसद्वेलया- गुरुकृपारूपी तरंगांनी संपन्न.
गुरुकृपेने परमात्मा प्राप्त होतो. परमात्म्याचे स्वरूप आहे आनंद. जसे जल संग्रहावरील तरंग जलाचेच असतात तसे आनंद सागरातील तरंगही आनंदाचेच असतात.
तरंग हे स्थिर असणाऱ्या जलाचे चंचल स्वरूप आहे.
तशा स्वरूपात जी मूलतः निश्चल निर्विकार असूनही चैतन्य स्वरूपात विश्व संचालन करणारी. या आनंद स्वरूपामुळे गुरुकृपा.
मदारुणकपोलया- मधु प्राशनाने कपोल म्हणजे गालावरचा प्रदेश लालबुंद झालेली. मधुरगीतवाचालया – मधुर गीत गुणगुणत असणारी.
कयापि घननीलया कवचिता वयं लीलया – घनश्याम असणाऱ्या कोणत्या देवीच्या लीलेमुळे आम्ही कवच असल्याप्रमाणे सुरक्षित आहोत?
अर्थातच आई जगदंबा त्रिपुरसुंदरीचीच ही कृपा आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply