कदंबवनमध्यगां कनकमंडलोपस्थितां,
षडंबरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम् |
विडम्बितजपारुचिं विकचचंद्रचूडामणिं ,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥४||
महाविद्या श्री त्रिपुरसुंदरीचे अतुलनीय वैभव सांगतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
कदंबवनमध्यगां- कदंब वृक्षाच्या अर्थात कल्पवृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी. कनकमंडलोपस्थितां- कनक अर्थात सोन्यापासून मंडल म्हणजे वर्तुळाकार आसनावर विराजमान असणारी. मंडल हे पूर्णत्वाचे, अखंडत्वाचे प्रतीक आहे. वर्तुळ ज्या बिंदूपासून आरंभ होते त्याच बिंदूवर समाप्त होते. स्वतःतच परिपूर्ण असणे हे वर्तुळाचे लक्षण. आई त्या पूर्णतेवर आरूढ आहे.
षडंबरुहवासिनीं- सहा कमळावर आरुढ असणारी. योगशास्त्रामध्ये मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्र अशा सहा चक्रांचे वर्णन असते. तेथे विविध संख्यांच्या कमळांचे वर्णन केलेले असते. या सहा चक्रांवर निवास अर्थात विश्राम करीत कुंडलिनी स्वरुपा आदिशक्ती प्रवास करते. त्यामुळे तिला सहा कमळांवर निवास करणारी असे म्हटले आहे. सततसिद्धसौदामिनीम् – भक्तगणांना त्यांची इच्छित वरदाने पुरवण्यासाठी सौदामिनी अर्थात विजेप्रमाणे अत्यंत चपलगतीने त्यांच्यापर्यंत जाण्यास सदैव सिद्ध असणारी.
विडम्बितजपारुचिं- आपल्या तेजाने जपा पुष्प म्हणजे जास्वंदीच्या फुलाच्या लाल रंगाला विडम्बित अर्थात चेष्टेने पराजित करणारी. विकचचंद्रचूडामणिं – कच म्हणजे केस. विकच म्हणजे व्यवस्थित रचना केलेले केस, अर्थात वेणी. त्यावर चूडामणि म्हणून जिने चंद्र धारण केला आहे अशी.
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये- भगवान शंकरांच्या सहधर्मचारिणी असणाऱ्या श्रीत्रिपुरसुंदरीचा मी आश्रय घेतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply