कुचांचितविपंचिकां कुटिलकुंतलालंकृतां ,
कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् |
मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं ,
मतंगमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥५||
पूज्यपाद आचार्यश्रींची प्रतिभा इतकी अलौकिक आहे की ते सहज बोलत जातात आणि अलंकार आपोआप प्रगट होतात. आता याच श्लोकात पहा, प्रथम दोन्ही चरणाच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी क आणि पुढील दोन चरणांच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी म अक्षराने किती सुंदर अनुप्रास साधला आहे?
कुचांचितविपंचिकां- मंडळाच्या मध्यभागी जिने वीणेचा दांडा धरलेला आहे अशी. अर्थात पूर्ण हृदयापासून आणि भक्तांच्या हृदयाला पूर्ण आकर्षित करणारे संगीत ज्यातून निर्माण होत आहे अशी. कुटिलकुंतलालंकृतां – कुटिल म्हणजे कुरळे किंवा गोल गोल गुंडाळलेले आपले केस जिने अत्यंत सुंदर रीतीने अलंकृत केली आहेत अशी.
कुशेशयनिवासिनीं- कुशेशय म्हणजे कमळ. त्यामध्ये निवास करणारी. कुटिलचित्तविद्वेषिणीम् – ज्यांचे चित्त कुटील असते अशा दुष्टांचा द्वेष अर्थात राग करणारी. त्या धर्मभ्रष्टांचा विनाश करणारी.
मदारुणविलोचनां- मधु प्राशनाने नेत्र लाल झालेली. मनसिजारिसंमोहिनीं – मनसिज अर्थात मनातून जन्माला येणारा म्हणजे कामदेव मदन. त्याचे अरी म्हणजे शत्रू ते भगवान शंकर. त्यांना संमोहित करणारी.
देवी पार्वती स्वरूपात तपस्यारत असणाऱ्या भगवान शंकरांच्या मनात देखील प्रेमाचा अंकुर जागृत करणारी.
मतंगमुनिकन्यकां- मतंग ऋषींच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या घरी कन्या रूपात अवतार घेतलेली. मधुरभाषिणीमाश्रये- मधूर भाषण असणाऱ्या श्री त्रिपुरसुंदरीचा मी आश्रय घेतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply