स्मरेत्प्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलांबरां,
गृहीतमधुपात्रिकां मधुविघूर्णनेत्रांचलाम् |
घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥६||
आचार्यश्री तथा भारतीय संस्कृतीच्या एका वेगळ्याच वैज्ञानिकतेने थक्क करणारा हा श्लोक.
स्मरेत्प्रथमपुष्पिणीं- या त्रिभुवन स्वरूप लतेवर आलेले पहिले पुष्प असणाऱ्या जगदंबेचे स्मरण करावे. रुधिरबिन्दुनीलांबरां- रक्त बिंदू प्रमाणे निल वस्त्र धारण केलेली.
प्रथम क्षणी आपल्याला हे वर्णन विचित्र वाटेल. पण त्यामागे फार मोठे वैज्ञानिक सत्य आहे.
रक्ताचा निळा रंग वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येतो.
पहिली गोष्ट म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्या तर निळसर रंगाच्या दिसतात.
दुसरी गोष्ट जेव्हा रक्तात प्राणवायूचे प्रमाण कमी होते त्यावेळी त्याचा रंग निळसर होतो.
याच कारणाने फुफ्फुसापासून हृदयापर्यंत प्राणवायू युक्त रक्त नेणाऱ्या नलिकेला धमणी असे म्हणतात तर हृदयापासून फुफ्फुसा पर्यंत प्राणवायूक्षीण रक्ताला नेणाऱ्या रक्तवाहिनीला नीला असेच म्हणतात.
शरीरातील सर्व अवयवांना प्राणवायू पुरवल्यामुळे या रक्तातील प्राणवायू कमी झालेला असतो.
अशा नीलवर्णीय रक्ताप्रमाणे रंग असणारे वस्त्र जिने धारण केलेली आहेत अशी.
पूज्य आचार्यश्रींचे दर्शन किती सूक्ष्म आहे ? याचा विचार करावा.
गृहीतमधुपात्रिकां- जिने आपल्या रसग्रहणासाठी हाती मधाचे पात्र धारण केले आहे अशी. मधुविघूर्णनेत्रांचलाम् – मधू प्राशन केल्याने जडावलेले नेत्र असणारी.
घनस्तनभरोन्नतां- उन्नत आणि भरगच्च स्तनमंडल असणारी. गलितचूलिकां- आपल्याच आनंदात मान हलवल्याने वेणी,गजरा गळून पडलेली
श्यामलां- सावळ्या,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये – भगवान शंकरांची सहधर्मचारिणी असणाऱ्या श्रीत्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply