सकुंकुमविलेपनामलकचुंबिकस्तूरिकां ,
समंदहसितेक्षणां सशरचापपाशांकुशाम् |
अशेषजनमोहिनीमरूणमाल्यभूषाम्बराम्,
जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकाम ॥७||
भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज जगदंबेचे स्मरण करताना कोणत्या स्वरूपाचे ध्यान करतात त्याचे वर्णन करताना ते म्हणतात,
सकुंकुमविलेपनाम्- कुंकुमासह अंगलेपन केलेली. आई जगदंबेने शरीराला चंदनाचा लेप लावलेला आहे. मस्तकावर हळदीचा लेप लावलेला असून त्यावर कुंकुमतिलक धारण केलेला आहे.
अलकचुंबिकस्तूरिकाम् – अलक म्हणजे केसांमध्ये अर्थात भांगात कस्तुरी भरलेली आहे.
समंदहसितेक्षणां- मंद मंद हास्य करीत जी भक्तगणांकडे पहात आहे अशी. सशरचापपाशांकुशाम् – शर म्हणजे बाण. चाप म्हणजे धनुष्य. पाश म्हणजे दोरी तर अंकुश या गोष्टी धारण करणारी.
अशेषजनमोहिनीम्- संपूर्ण जगाला, सकल जनांना आकृष्ट करून घेणारी.
अरूणमाल्यभूषाम्बराम्- अरुण सूर्योदयापूर्वीच्या लालिम्याप्रमाणे आकर्षक रंगाच्या माळा, आभूषणे आणि वस्त्र धारण करणारी.
जपाकुसुमभासुरां- जपाकुसुम अर्थात जास्वंदीचा फुलांप्रमाणे भासुरा अर्थात तेजस्वी असणारी. जास्वंदाचे फुल लालबुंद असते. लाल हा जगातला सर्वाधिक आकर्षक रंग. तशी अत्यंत आकर्षक असणारी आई जगदंबेची मूर्ती, तिचे स्वरूप.
जपविधौ- जप समयी, आई जगदंबेच्या मंत्रांचे चिंतन मनन करीत असताना. त्याद्वारे आई जगदंबेच्या मंत्रांमध्ये वर्णन केलेल्या स्वरूपाचे ध्यान करताना, स्मराम्यम्बिकाम- मी आई अंबिकेच्या मंत्र स्वरूपाचे अर्थात मनन केल्याने तारण करणाऱ्या स्वरूपाचे स्मरण करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply