नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां
परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्यां |
नगेन्द्रकन्यावृषकेतनाभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ १ ‖
भगवान शंकर आणि देवी पार्वती या अभिन्न शक्ती आहेत. या दोघांच्या एकत्रित स्वरूपाला अर्धनारीनटेश्वर असे म्हणतात. इतके त्यांचे एकरूपतत्व आहे. इतर वेळी देखील त्या दोघांचे एकत्रित वर्णन पहावयास मिळते. प्रस्तुत स्तोत्रात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या दोघांनाही एकत्रित वंदन करीत आहेत.
ते म्हणतात,
नमः शिवाभ्यां – श्री शिवांना नमस्कार असो.
ही पहिलीच पहिली रचना मोठी सुंदर आहे. यात शिव शब्दाचे द्विवचन वापरले आहे. या रचनेला एकशेषद्वंद्व समास म्हणतात. पती आणि पत्नीच्या नावाचा एकत्र विचार करताना केवळ पतीच्या नावाचे द्विवचन वापरणे, अशी या समासाची रचना. यात शिवाभ्यां म्हणतांना, भगवती देवी पार्वती आणि भगवान श्री शंकर अशा दोघांना एकत्रित वंदन अपेक्षित आहे.
दोन असून सुद्धा अशा एकत्रित कथनातून एकशेष द्वंद्व वापरून आचार्य त्या दोघांचे एकरूपत्व विशेषत्वाने अधोरेखित करीत आहेत.
नवयौवनाभ्यां – हे दोघेही नवयौवन युक्त आहेत. त्यातील उत्साह, आनंद तेथे अपेक्षित आहे.
परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्यां – त्या दोघांनी परस्परांच्या वपु म्हणजे शरीराला आलिंगन दिलेले आहे.
परस्परांच्या दिशेने असलेल्या हाताने त्या दोघांनीही एकमेकांना धरलेले आहे. ही त्यांची परस्पर पूरकता आचार्य श्री या शब्दातून व्यक्त करीत आहेत.
नगेन्द्रकन्या- नग म्हणजे पर्वत. त्यांचा इंद्र म्हणजे राजा. पर्वतांचा राजा म्हणजे हिमालय. त्याची कन्या म्हणजे देवी पार्वती. हिमालयाच्या घरी प्रकट झाल्यामुळे देवी पार्वतीला नगेन्द्र कन्या म्हंटले आहे.
वृषकेतनाभ्यां – वृष म्हणजे नंदी. तो ज्यांच्या केतन म्हणजे झेंड्यावर काढलेला आहे ते वृषकेतन.
नंदी हे धर्माचे प्रतीक आहे. धर्म हीच भगवंताचे अधिष्ठान आहे. तोच त्यांचा महिमा आहे. म्हणून वाहन आणि ध्वज दोन्हीकडे नंदी आहे.
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा भगवान शंकर आणि देवी पार्वती राणी वंदन करतो.
— प्रा.स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply