नमः शिवाभ्यां सरसोत्सवाभ्यां
नमस्कृताभीष्टवरप्रदाभ्यां |
नारायणेनार्चितपादुकाभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ २ ‖
पार्वती परमेश्वराच्या वंदना करिता सिद्ध झालेले जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज स्तोत्रात पुढे म्हणतात,
नमः शिवाभ्यां – श्री शिव म्हणजे कल्याणकारक असणारे भगवान शंकर आणि श्री शिवा म्हणजे कल्याणकारीणी असणारी देवी पार्वती यांच्या एकत्रित विग्रहाला,
सरसोत्सवाभ्यां – हे दोघेही अत्यंत सरस आहेत. आणि उत्सव रत आहेत.
हे वर्णन मोठे महत्त्वाचे आहे. सामान्यतः आपल्या डोक्यात बसलेले असते की भगवान शंकर म्हणजे वैराग्याची देवता. स्मशान वासी असणारे भगवान शंकर हे जणू काही, शुष्कतेचे नैराश्याचे दैवत. पण तसे नाही. भगवान शंकर वैराग्याची देवता आहेत नैराश्याची नाही. वैराग्य ही नकारात्मक भावनाच नाही. त्यात जीवनाचे वास्तव समजून घेऊन, त्याच्या नश्वरतेला जाणून, मग त्याचा तटस्थपणे आनंद घेण्याची अद्वितीय रचना वर्णिली आहे.
भगवान शंकर त्या वैराग्याची देवता असल्यामुळे, त्यांच्या रसपूर्णतेचा विचार आचार्य मांडतात.
दुसरी गोष्ट म्हणजे ही रसपूर्णता केवळ त्यांच्या पुरती वैयक्तिक नाही ही तर ती सगळ्या जगाला देण्यासाठी ते सिद्ध आहेत हे सांगण्यासाठी उत्सवप्रियतेचे वर्णन केले. उत्सवात सगळ्यांना सहभागी करून घेतले जाते.
नमस्कृताभीष्टवरप्रदाभ्यां – अशा आलेल्या सगळ्या शरणागत भक्तांनी नमस्कार केल्यानंतर, त्यांना अभीष्ट याचा अर्थ योग्य असणारे वर प्रदान करणारे.
नारायणेनार्चितपादुकाभ्यां- नारायण अर्थात भगवान विष्णू. नारा म्हणजे जल. तेच ज्यांचे अयन म्हणजे राहण्याचे स्थान, ते नारायण. भगवान विष्णू क्षीरसागरात निवास करतात त्याचा हा संदर्भ.
त्या भगवान विष्णूंचा द्वारे ज्या दोघांच्या चरणांची सेवा केल्या जाते,
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – त्या भगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती ला वंदन असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply