नमः शिवाभ्यां जगदीश्वराभ्यां
जगत्पतिभ्यां जयविग्रहाभ्यां |
जम्भारिमुख्यैरभिवन्दिताभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ ४ ‖
शिवपार्वतींचा दिव्य स्वरूपाचे अभिवंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नमः शिवाभ्यां – सकल विश्वाच्या कल्याणाचे अधिष्ठान असणाऱ्या श्री शिव आणि श्री शिवानी यांना नमस्कार असो.
जगदीश्वराभ्यां – हे अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आहेत. संपूर्ण विश्वाचे ईश्वर आहेत.
जगत्पतिभ्यां – जगत्पति अर्थात या जगाचे पालन कर्ते आहेत. त्यांच्या इच्छेने या जगातील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप निश्चित होत असते. त्यांच्याच कृपेने प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चालत असते.
जयविग्रहाभ्यां – जय हे जणू त्यांचे स्वरूप आहे. त्यांचा कधीच पराजय होत नाही. पराजय हा नेहमी आपल्या पेक्षा वरिष्ठांकडून होत असतो. हे दोघे विश्वातील सर्वश्रेष्ठ सत्ता असल्याने, त्यांचा पराजय होण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली कोणीही नाही. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने अपराजित आहेत.
इतर कोणत्या देवतेला संकट आले तर ते भगवान शंकरांना शरण येतात. श्रीशंकर सगळ्यांना त्यातून मुक्त करतात.
बाह्य जीवनात सगळ्यात मोठे संकट म्हणजे मृत्यू. त्या काळावर सत्ता चालणाऱ्या भगवान महाकालाला पराजित कोण करणार? त्यामुळे आचार्य श्री हे विशेषण वापरतात.
जम्भारिमुख्यैरभिवन्दिताभ्यां – जम्भा नावाच्या राक्षसाचा अरि म्हणजे शत्रू तो जम्भारी. हे देवराज इंद्राचे विशेषण आहे. त्यांनी या नावाचा राक्षस मारला होता. ते देवराज इंद्र ज्यांच्यामध्ये प्रमुख आहेत अशा सर्व दैवतांच्या द्वारे ज्या उभयतांना सदैव वंदन केले जाते,
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा भगवान शंकर आणि देवी पार्वतीला नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply