नमः शिवाभ्यां परमौषधाभ्यां
पञ्चाक्षरीपञ्जररञ्जिताभ्यां |
प्रपञ्चसृष्टिस्थितिसंहृताभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ ५ ‖
आई पार्वती आणि भगवान शंकरांच्या लोकविलक्षण एकात्मतेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात,
नमः शिवाभ्यां – कल्याण कार्य आई जगदंबा आणि कल्याणकारी भगवान शिव,
परमौषधाभ्यां – हे दोघेही परम औषध आहेत.
अर्थात त्यांचे नामोच्चार हेच सगळ्यात मोठे औषध आहे. त्याने सामान्य रोग जाऊद्या सगळ्यात मोठा म्हणजे भवरोग देखील होतो.
सगळ्या रोगांवरचा उपाय आहे मुक्ती. रोग हा देहाचा विषय आहे. बाह्य जड देहाचा. तसेच सूक्ष्म देहातील मनाचा.
मात्र या सगळ्या देहांच्या पलीकडे असणारी विदेह आनंदावस्था या दोघांच्या कृपेने प्राप्त होत असल्याने, या दोघांना परम औषध असे म्हटले आहे.
पञ्चाक्षरीपञ्जररञ्जिताभ्यां –
पंचाक्षरी म्हणजे पाच अक्षरांचा मंत्र. नमः शब्दाने युक्त असणारा शिवाय. त्या मंत्राला येथे पञ्जर असे म्हटले आहे.
पंजर म्हणजे ढाच्या. अस्थिपंजर शब्द आपल्याला माहिती आहे. ढाच्या हा त्या शरीराचा आधार आहे. त्याप्रमाणे शिवपंचाक्षरी मंत्र या विश्वाचा आधार आहे असे आचार्य सूचित करीत आहेत.
या ढाच्याने रंजित म्हणजे शोभून दिसणारे.
प्रपञ्चसृष्टिस्थितिसंहृताभ्यां
प्रपंच अर्थात हा संपूर्ण ब्रह्मांडाचा पसारा. त्याची सृष्टी म्हणजे निर्मिती, स्थिती म्हणजे पालन आणि संहृती म्हणजे विनाश. या तीनही गोष्टी याच उभयतांच्या इच्छेवर अवलंबून आहेत.
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा या भगवान शंकर आणि देवी पार्वती ला नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply