नमः शिवाभ्यामशुभापहाभ्यां
अशेषलोकैकविशेषिताभ्यां |
अकुण्ठिताभ्यां स्मृतिसम्भृताभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ ८ ‖
सकाळ विश्वासी माता-पिता असणाऱ्या भगवान श्री शंकर आणि पार्वतीच्या एकत्रित वंदनाला पुढे नेताना आचार्य श्री म्हणतात,
नमः शिवाभ्याम् – भगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती या दोघांना नमन असो
अशुभापहाभ्यां- हे दोघेही अशुभाचा विनाश करणारे आहेत.
शरण येणाऱ्या भक्तांच्या जीवनात जे जे काही अशुभ असेल त्या सगळ्याचा ते विनाश करतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यात मोठा रोग म्हणजे जो भवरोग त्याचा विनाश यांच्या कृपेने होत असतो.
या संसारातील दुःख विलय पावत असते.
या दोघांची उपासना जे कोणी करतात त्यांच्या जीवनात सर्व मंगलच घडत असते.
अशेषलोकैकविशेषिताभ्यां –
अशेष म्हणजे परिपूर्ण. अलौकिक म्हणजे दिव्य.
विशेषित म्हणजे वैशिष्ट्य.
अर्थात या जगात विद्यमान असणाऱ्या सगळ्या दिव्य वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे.
ज्यांच्याजवळ नाही असे कोणतेच वैभव जगात नाही.
अकुण्ठिताभ्यां – कुंठा म्हणजे समस्या, अडचण, अडथळा, कुचंबणा.
भगवंताला यापैकी कोणत्याच गोष्टीचा संबंध नसतो. सर्व तंत्र स्वतंत्र असणारी ईश्वरी सत्ता कशानेही कुंठित होत नाही. त्यासाठी या दोघांना अकुण्ठिताभ्यां असे म्हटलेले आहे.
स्मृतिसम्भृताभ्यां – भक्तांनी स्मरण केल्याबरोबर प्रगट होणारे. त्यांच्या हाकेला धावून जाणारे.
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा भगवान शंकर आणि देवी पार्वती ला नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply