नमः शिवाभ्यां रथवाहनाभ्यां
रवीन्दुवैश्वानरलोचनाभ्यां |
राकाशशाङ्काभमुखाम्बुजाभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ ९ ‖
अनंतकोटी ब्रह्मांडनायिक आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायिका भगवान शंकर तथा देवी पार्वतीच्या वंदन समयी आचार्यश्री म्हणतात,
नमः शिवाभ्यां – भगवान शंकर आणि देवी पार्वतीला नमस्कार असो.
रथवाहनाभ्यां – जे रथामध्ये विराजमान असतात. रथ साम्राज्याचे प्रतीक आहे. सर्वश्रेष्ठ विभूती रथामध्ये विराजमान केली जाते.
भगवंताची सुद्धा रथयात्रा याच साठी काढली जाते.
रवीन्दुवैश्वानरलोचनाभ्यां |
रवी म्हणजे सूर्य. इंदु म्हणजे चंद्र आणि वैश्वानर म्हणजे अग्नी.
या तीनही गोष्टी परम तेजस्वी म्हणून विख्यात आहेत. या तीन्ही गोष्टी भगवंताच्या तीन नेत्र स्वरूपात वर्णिलेल्या असतात.
सूर्यप्रकाशात इतरांना सर्व जगाचे ज्ञान होते. भगवंताच्या जवळ सूर्यच नेत्र असल्याने त्यांचे ज्ञान त्यांच्या हातात आहे.
त्यांचे ज्ञान स्वयंप्रज्ञ आहे. स्वतंत्र आहे. त्यांना कशाचाही ज्ञानासाठी अन्य कोणाच्या प्रकाशावर अवलंबून राहावे लागत नाही. हे सांगण्यासाठी सर्वच देवतांच्या वर्णनामध्ये या तीन तेजस्वी गोष्टींना नेत्र रूपात वर्णिलेले असते.
राकाशशाङ्काभमुखाम्बुजाभ्यां
राका म्हणजे पौर्णिमा. त्या पौर्णिमेचा शशांक म्हणजे चंद्र. त्याची आभा म्हणजे तेज. तसे अत्यंत तेजस्वी तथा परिपूर्ण, अतीव सौंदर्यसंपन्न, परम आकर्षक अशा प्रकारचे ज्यांचे मुखकमल आहे असे.
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा भगवान शंकर आणि देवी पार्वतीला नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply