श्री गणेश अवतारलीला ४ – श्री उमांगमलज अवतार.
भगवान गणेशांचा भाद्रपदातील जन्मोत्सवा असो की माघ महिन्यातील. अनेक जागी गणेश जन्म म्हटला की एकच कथा ऐकवली जाते. देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून गणपती तयार केला. इ.
गंमत अशी आहे की देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून झालेल्या उमांगमलज अवताराची जी कथा आपण ऐकतो ती ना भाद्रपद चतुर्थी ची आहे ना माघ चतुर्थीची. ती कथा आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीची.
भगवान गणेशांचा निर्गुण निराकार स्वरूपाचे आत्यंतिक सुंदर चित्रण या कथेत आली असल्याने ही कथा जनमानसात खूप रूढ आहे. मात्र या कथेचा सामान्य अर्थ लागूच पडत नाही.
मुळात एखाद्या महानगरीतील सर्व माता भगिनींच्या अंगावर मिळून तरी पुतळा बनन्याइतका मळ असेल का? आणि जर नसेल तर देवी पार्वती इतकी अस्वच्छ होती का? तर नक्कीच नाही. पण शब्द तर तसाच आहे. उमा म्हणजे पार्वतीच्या अंगावरील मळापासून जन्माला आलेला. उमांगमलज. मग या कथेचा अर्थ काय?
तर या कथेचा गूढ अध्यात्मिक अर्थ म्हणजे आपली बुद्धी हीच पार्वती आहे. त्या बुद्धीवर चढलेले ममत्त्व आणि अहंकार हेच खरे मळ आहेत.
हे मळ गळून पडले की जे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म तत्त्व आकळते. त्यालाच उमांगमलज असे म्हणत असतात.
या कथेतील प्रत्येकच गोष्ट अशीच रूपकात्मक शैलीत वर्णिलेली आहे.
आपल्या आत असणारी बुद्धी हीच पार्वती आहे. तिला ध्यानाने शुद्ध व्हायचे आहे. त्यासाठी ती मन रुपी नंदीला आदेश देते. त्याने शंकरांना आत सोडल्यामुळे तिचा आदेश नाकारल्यावर तिचे मी आणि माझेपण गळून पडते. तोच मळ. असे या कथेचे गूढार्थ आहेत.
शेवटी सगुण-साकार जग च्या विपरीत निर्गुण-निराकार गज मस्तक या बालकाला बसवले आणि ते गजानन झाले असा शुद्ध आध्यात्मिक विचार त्यात मांडलेला आहे.
अशा या उमांगमलज अवताराचा प्रगटोत्सव आहे कार्तिक शुद्ध चतुर्थी.
जय उमांगमलज.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply