नवीन लेखन...

श्री वेंकटेश स्तोत्रम् – मराठी स्वैर अनुवादासह

आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे.

प्रथम श्लोकात श्रीनिवास व रमा यांचे निकटचे सान्निध्याचे वर्णन करून वेंकटेशाच्या विजयाची कामना केली आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांनी, विशेषतः राण्या व इतर उच्चपदस्थांच्या स्त्रियांनी स्तनांना केशर कुंकुमादि सुगंधी द्रव्यांनी सुशोभित करण्याची पद्धत असावी. त्याच अनुषंगाने इतर अनेक ठिकाणी वापरलेली कल्पना येथेही वापरलेली दिसते.

दुस-या श्लोकातील कल्पनाही (आपली आराध्य देवता सर्वश्रेष्ठ असून इतर अनेक देवतासमूह आपल्या आराध्य देवतेचे पूजन करतात, तिच्या चरणी शरण येतात) बहुतेक सर्व स्तोत्रांमधून मांडलेली आहे.

श्री वेंकटेश हा विष्णूचा अवतार असल्याने त्याला श्रीकृष्ण व श्रीराम स्वरूप मानले जाते व त्यांचे गुणवर्णन केले जाते. त्याला अनुसार पाचव्या श्लोकात श्रीकृष्णाचे तर सहाव्या,सातव्या व आठव्या श्लोकात श्रीरामाचे वर्णन दिसते.

शेवटी श्री वेंकटेशाखेरीज अन्य कोणीही त्राता नाही असे सांगून स्वामींनी आपल्या भक्तीचे फळ म्हणून आपल्याला सदैव वेंकटेशाची आराधनाच करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना केली आहे.

मराठी भाषिक भाविकांमध्ये स्वा. देविदास यांनी रचलेले ‘व्यंकटेश स्तोत्र’ अत्यंत भक्तिभावाने पठण केले जाते. ते मुख्यतः व्यंकटेशाचे स्वरूप वर्णन, सांगोपांग पूजा व प्रार्थना यावर आधारलेले आहे. स्वा. अण्णा यांचे प्रस्तुतचे वेंकटेश स्तोत्र पूर्णतः वेगळे आहे.


कमलाकुचचूचुक कुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो ।
कमलायतलोचन लोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते ॥ १॥

मराठी- लक्ष्मीच्या स्तनाग्रांवरील केशरामुळे ज्याचे सुंदर निळे शरीर लालसर झाले आहे, ज्याचे डोळे कमळासारखे लांबट आहेत अशा वेंकट पर्वताच्या राजा तू यशस्वी हो.

कमला उरिचे करिते बहु सुंदर केशर लाल निळ्या तनुला ।
कमलासम लांबट नेत्र जया, जननाथ मिळो जय श्रीनिधिला ॥ ०१


सचतुर्मुखषण्मुखपंचमुखप्रमुखाखिलदैवतमौलिमणे ।
शरणागतवत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपते ॥ २॥

मराठी- ब्रह्मदेव, कार्तिकेय, शंकर या प्रमुख देवांबरोबर इतर सर्व देवांमध्ये श्रेष्ठ (मुकुट मणी) असणा-या, तुला शरण येणा-यांसाठी दयाळूपणाचा मोठा साठाच असलेल्या, वृष पर्वताच्या राजा माझे रक्षण कर.

मुरुगेश गिरीश प्रजापति संगत अन्य सुरांत किरीट मणी ।   (मुरुगेश- कार्तिकेय, सुर-देव)
वृषतुंगनृपा  मम राख निगा, करुणा निधि तू नमता चरणी ॥ ०२


अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपराधशतैः।
भरितं त्वरितं वृषशैलपते परया कृपया परिपाहि हरे ॥ ३॥

मराठी- हे हरी, तुझ्या बाबतीत उठल्या सुटल्या बेसुमारपणे केलेल्या दुःसह शेकडो अपराधांनी परिपूर्ण अशा मला आपल्या आत्यंतिक दयाळूपणाने सावर.

अपराध सदा न कदा करण्यातच  बेछुट  मी शतशः बुडता ।
करुणा तव श्रेष्ठ अलैकिक सावरु दे  वृषशैलनृपा त्वरिता ॥ ०३


अधि वेङ्कटशैलमुदारमतेः जनताभिमताधिकदानरतात् ।
परदेवतया कथितान्निगमैः कमलादयितान्न परं कलये ॥ ४॥

मराठी- लोकांना (भक्तांना) त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त दान देणारा, इतर देवांनी व वेदांनी वर्णन केलेल्या, लक्ष्मीचा प्रिय असलेल्या वेंकट पर्वताच्या अधिपतिखेरीज मी इतर कोणाचाही विचार करत नाही.

अनपेक्षित जास्तच दान जना वितरी वृषतुंगनृपा स्मरतो ।
इतरां न, श्रुती सुर सर्व हि वर्णिति ज्या, अनघा प्रिय नायक तो ॥ ०४


कलवेणुरवावशगोपवधूशतकोटिवृतात्स्मरकोटिसमात् ।
प्रतिवल्लविकाभिमतात्सुखदात् वसुदेवसुतान्न परं कलये ॥ ५॥

मराठी- पाव्याच्या सुमधुर आवाजाने मुक्त (स्वैर) झालेल्या शेकडो गोपिकांनी ज्याला वेढले आहे, जो शतावधि मदनांच्या समान (सुंदर) आहे, जो गोपींचा अत्यंत आवडता आहे, जो सौख्यकारी आहे, अशा वसुदेवाच्या पुत्राखेरीज अन्य कोणाचाही विचार मी करत नाही.

मुरली स्वर स्वैर करी शत गोपि, दिसे शत मन्मथ जेवि बरा ।
मन आठवते, प्रिय गोपवधूंस, हरी, सुखदायक ना दुसरा ॥ ०५

टीप- काही ठिकाणी ‘प्रतिवल्लविका’ ऐवजी ‘प्रतिपल्लविका’ असा पाठभेद दिसतो. परंतु तो घेतल्यास अर्थ लावणे दुरापास्त होते.


अभिरामगुणाकर दाशरथे जगदेकधनुर्धर धीरमते ।
रघुनायक राम रमेश विभो वरदो भव देव दयाजलधे ॥ ६॥

मराठी- अत्यंत सुंदर, गुणांचे आगर, दशरथाचा पुत्र, जगातील एकमेव (सर्वश्रेष्ठ) धनुर्धारी, स्थिर बुद्धी, रघुकुलाचा प्रमुख, रमापती, शक्तिशाली, कृपासागर असलेल्या श्रीरामा माझ्यासाठी तू वरदायक हो.

अति सुंदर दाशरथी रघुनाथ जगी धनुधारक थोर खरा ।
गुणसिंधु रमापति थोर मती बलवान कृपानिधि देइ वरा ॥ ०६


अवनीतनयाकमनीयकरं रजनीकरचारुमुखाम्बुरुहम् ।
रजनीचरराजतमोमिहिरं महनीयमहं रघुराममये ॥ ७॥

 मराठी- धरणीकन्ये (सीते) ने ज्याचे सुरेख (बलवान) हात हातात घेतले आहेत, ज्याचे मुखकमल चंद्राप्रमाणे सौंदर्ययुक्त आहे, निशाचरांच्या राजा (रावणा) च्या अंधारासाठी जो सूर्य आहे, अशा श्रेष्ठ श्रीरामाकडे मी आश्रय मागतो.

कर भूमिसुता धरि आवडता, मुखनीरज बिंब शशी दिसतो ।
तम रावण नामक, सूर्य तया रघुनायक, दे मज आश्रय तो ॥ ०७

(रजनीकर- चंद्र, रजनीचर- रात्री हिंडणारे, दानव. त्यांचा राजा, पर्यायाने रावण. रावणरूपी अंधःकाराचा नाश करणारा सूर्य, पर्यायाने सूर्यवंशी राम)


सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुकायममोघशरम् ।
अपहाय रघूद्वहमन्यमहं न कथञ्चन कञ्चन जातु भजे ॥ ८॥

मराठी- ज्याचे वदन सुंदर आहे, जो सर्वांचा मित्र आहे, जो सहजासहजी प्राप्त होतो, इतरांसाठी सुखकारक आहे, ज्याचा धाकटा भाऊही सुस्वरूप आहे, ज्याचे शरीर साजिरे आहे, ज्याचे बाण अचूक असतात, असा सर्वोत्तम रघुनाथ सोडून मी दुस-या कोणाची कशाला प्रार्थना करू !

मुख सुंदर, मित्र, मिळे सहजी, तनु सुंदर, रम्य कनिष्ठ असे ।
नच भाकड बाण, बहू सुख दे, रघुनंदन  त्यागुन जाउ कसे ॥ ०८


विना वेङ्कटेशं न नाथो न नाथः सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि ।
हरे वेङ्कटेश ! प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ ॥ ९॥

मराठी- वेंकटेशाखेरीज आमचा दुसरा कोणताही पालक नाही, पालक नाही, मी नेहेमी वेंकटेशाचे स्मरण करतो, स्मरण करतो.  हे वेंकटेशा, आमच्यावर कृपा कर, कृपा कर. हे वेंकटेश आम्हाला आवडत्या गोष्टी दे.

नसे  वेंकटेशाविना कोण त्राता, मला आठवे नित्य शेषाद्रि साचा ।
दया दाव आम्हावरी श्रीनिधी तू,  करी पूर्ण तू हेत आम्हा मनीचा ॥ ०९


अहं दूरतस्ते पदाम्भोजयुग्मप्रणामेच्छयाऽऽगत्य सेवां करोमि ।
सकृत्सेवया नित्यसेवाफलं त्वं प्रयच्छ प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश ॥ १०॥

मराठी- मी तुझ्या चरणकमलांना वंदन करण्याच्या हेतूने दूरवरून येऊन तुझी सेवा करीत आहे. या एकवेळ केलेल्या सेवेचे फळ म्हणून हे वेंकटेशा, तुझी नेहेमी सेवा करण्याचे फळ मला दे, मला दे.

तुझ्या पूजण्या पादपद्मा, दुरुनी असे पातलो वंदना मी कराया ।
तया एक पूजेतूनी नित्य पूजा मला पारितोषीक दे देवराया ॥ १०


अज्ञानिना मया दोषानशेषान् विहितान् हरे ।
क्षमस्व त्वं क्षमस्व त्वं शेषशैलशिखामणे ॥ ११॥

मराठी- हे श्रीहरी, मी मूर्खपणाने केलेल्या अनेक अनुचित अपराधांसाठी, हे शेषपर्वताच्या अधिपती, मला क्षमा कर, क्षमा कर.

मी मूढतेतुनी केली अयोग्य सगळी कृती ।
करी क्षमा सर्वांना तू वृषाद्री नृप श्रीपती ॥ ११

— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on श्री वेंकटेश स्तोत्रम् – मराठी स्वैर अनुवादासह

  1. Sir, Please translate Shri Venkateswara Prapatti and Shri Venkateswara mangalasasanam in marathi. Your marathi translation is beautiful!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..