|| हरि ॐ ||
हनोई (उत्तर व्हिएतनाम) येथील ग्रंथालयात जी जुनी सयामी पोथी आहे तिच्यात श्री गणेशाच्या सहा रेखाकृती आहेत. त्यापैकी कासवावर उभी असलेली विघ्नेश्वर स्वरुपात श्रीगणेश मूर्तीचे दर्शन घडविले आहे.
या मूर्तीच्या सर्वांगावर खूप अलंकार काखाविण्यात आले आहेत. मूर्तीचे गुडघे वाकलेले व एकमेकांपासून दूर अंतरावर आहेत. पायाच्या टाचा जवळ आणलेल्या आढळतात. या मूर्तीचे नाव ‘विघ्नेश्वर’ असून ती कासवावर उभी आहे. कासव हे कुर्मवताराचे चिन्ह आहे. कासवावर आरूढ असलेले असे श्री गजाननाचे आगळेच दर्शन आपणास घडते.
जुन्या सयामी पोथीतील हा श्री गणेश म्हणजे संशोधकांना विचार करावयास लावणारा आहे. मुकुटाच्या कळसापासून ते कासवाच्या वाहनापर्यंत प्रत्येक बाबतीत वेगळेपणा असला तरीही भारतीय संस्कृतीशी निगडीत आहे.
मुकुटाच्या कळसाचा आकार कमळाप्रमाणे असून एकूण मूर्तीचा आकार, कंबर, पितांबर व पट्टा ह्या सर्वांवर कमळाच्या आकाराची छाप आहे. एकूण मूर्तीवर देवीची छाप वाटते. कमळाचा आकार हे या मूर्तीचे वैशिष्टय आहे.
कपाळावर त्रिनेत्र दाखविण्यात आला आहे. कित्येकांच्या मते त्रिनेत्र गणपती हे श्री गणेशाचे सत्य ज्ञानमय रूप आहे. तो वेदांत रहस्याचा पूर्ण ज्ञानी असल्यामुळे महादेवाप्रमाणे त्याला तिसरा नेत्र दाखविण्यात आला असावा असे वाटते. पण हा परिपाठ भारतात नसताना इतरत्र का ह्याचे स्पष्टीकरण मिळत नाही. भारतात एकही त्रिनेत्र गणपतीची मूर्ती नाही. आणि तृतीय ज्ञानपंथ स्वरूप परदेशात उपासले जाते हे एक आश्चर्यच आहे.
श्री गणेश सहस्रनामामध्ये असलेल्या परंतू भारतात प्रचलित नसलेल्या मूर्ती चीन, जपान, हनोई, सयाम येथे आहे हे विशेष किंवा आपल्या येथे असलेल्या नावांचा अभ्यास करून तेथील मूर्तिकारांनी त्याप्रमाणे मूर्ती घडविल्या असाव्यात असे वाटते किंवा बाहेरील देशांत सापडलेल्या मूर्तींची नांवे आपल्या सहस्रनामात सापडावीत हे विचार करण्यासारखे आहे.
हा गणेश चतुर्भुज आहे. पूढील दोन हात नेहमीप्रमाणे असून मागील दोन हात मात्र खांद्यापासून नसून कोपरापासून आलेले आहेत. हे असे का ह्याचा उल्लेख नाही. खेनर, इंडोचीन वगैरे ठिकाणी ह्या प्रकारच्या मूर्ती सापडतात. तसेच हातात जी आयुधे दाखविलेली आहेत ती वेगळी आहेत. उजव्या बाजूच्या वरच्या हातात परशु आहे तर दुसर्या हातात संपूर्ण आकाराचा सुळा आहे. डाव्या बाजूच्या वरच्या हातात दोरीचा फास आहे तर दुसर्या हातात गोल दाखविला आहे. इतरत्र न दिसणारी ही आयुधे होत. ह्या विभागात इंद्र, वरुण, यम इत्यादी वैदिक देवतांचाही उल्लेख सापडतो. त्यावरून वैदिक देवतांच्या आयुधांचा पौराणिक गणेशामध्ये समावेश केला गेला असावा असे वाटते.
ह्या देवतेचे खास विशेष म्हणजे ह्याला एक संपूर्ण सुळा असून दुसरा सुळा संपूर्ण तुटलेला आहे. व तो मूर्तीच्या उजव्या हातात दाखविला आहे. तसेच गळ्यात सर्पाचे यज्ञोपवीत नाही.
आशातर्हेने अनेक तात्विक कल्पनांचा श्रीगणेशाच्या स्वरुपात समावेश करून त्याप्रमाणे त्याला रूपे मिळाली आहेत. इतक्या लोकप्रियतेचे भाग्य फारच थोडया देवतांच्या वाटयाला आले आहे. श्रीगणेशाचे आगळे दर्शन जगभर पसरलेल्या भारतीय संस्कृतीची साक्ष देत आहे.
।। ॐ गं गणपतये नम: ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply