चिदंशं विभुं निर्मलं निर्विकल्पम्
निरीहं निराकारमॊङ्कारवॆद्यम् ।
गुणातीतमव्यक्तमॆकं तुरीयम्
परं ब्रह्म यं वॆद तस्मै नमस्तॆ ॥ १ ॥
भगवान जगद्गुरू आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्री विष्णूच्या वंदना साठी रचलेल्या विविध स्तोत्रांचे रसग्रहण आपण आजपासून करणार आहोत.
यात आरंभी असणाऱ्या या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्रा मध्ये आचार्य श्री म्हणतात,
चिदंशं – चैतन्य अंशाने युक्त असणारे. हा पहिलाच शब्द व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. यात चैतन्याचा अंश असा अर्थ नाही. ज्यांचा प्रत्येक अंश चैतन्यानेच युक्त आहे. ज्यांच्या ठाई भौतिकतत्वाचा, प्रकृतीचा कोणताच अंश नाही, जे परम शुद्ध चैतन्य आहे, असा अर्थ येथे अपेक्षित आहे.
विभुं – परम व्यापक. विष्णू शब्दाचा देखील तोच अर्थ आहे.
निर्मलं – ज्यांच्या ठिकाणी मायेचा कोणताच मळ उपस्थित नाही असे. परम शुद्ध.
निर्विकल्पम् – ज्यांना कोणताच विकल्प नाही असे. एकमेवाद्वितीय.
निरीहं – ज्यांना काहीच मिळवायचे नाही. कोणतीच इच्छा नाही असे.
निराकारम् – निर्गुण निराकार असे.
ओङ्कारवॆद्यम् – शास्त्र ओंकाराच्या द्वारे ज्यांचे निर्देशन करते असे.
गुणातीतम् – तीन गुणांच्या अतीत असणारे. निर्गुण.
अव्यक्तम् – व्यक्त म्हणजे सगुण साकार. त्याच्या विपरीत, निर्गुण निराकार ते अव्यक्त.
एकं – एकमेवाद्वितीय.अतुलनीय.
तुरीयम् – जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे.
परं ब्रह्म यं वॆद तस्मै नमस्तॆ – ज्यांचे वेद परब्रह्म स्वरूपात वर्णन करते त्यांना वंदन असो.
–प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply