शरीरं कलत्रं सुतं बन्धुवर्गम्
वयस्यं धनं सद्म भृत्यं भुवं च ।
समस्तं परित्यज्य हा कष्टमॆकॊ
गमिष्यामि दुःखॆन दूरं किलाहम् ॥ १० ॥
भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही.
आरंभी तो शब्दार्थ पाहू, आचार्य श्री म्हणतात,
शरीरं – माझे अत्यंत आवडते शरीर.
कलत्रं – जिच्या सोबत संसार केला ती पत्नी.
सुतं – ज्यांच्यावर कायम प्रेम केले ते पुत्र, संतती.
बन्धुवर्गम् – ज्यांच्या सोबत आयुष्यभर विविध सूखे भोगली ते आप्तस्वकीय.
वयस्यं – बंधुवत् प्रेम केलेले मित्र.
धनं – आयुष्यभर प्रचंड प्रयत्न करून मिळवलेला पैसा.
सद्म – अफाट कष्ट करून स्वप्न पहात बांधलेले घर.
भृत्यं – नोकर चाकर , सेवेकरी.
भुवं च – असा हा संपूर्ण संसार.
समस्तं परित्यज्य – या सगळ्यांना सोडून.
हा कष्टम् – अत्यंत कष्टाने
एको गमिष्यामि दुःखॆन दूरं किलाहम् – दुःख अपूर्ण अवस्थेत मी एकटाच दूर जाईल का?
आता असा शब्दार्थ वाचला तर याच भगवान विष्णूंचा संबंध कुठेच दिसत नाही.
हे एखाद्या पराधीन, दुःखी जीवाचे आत्मचरित्र वाटते.
पण हे सांगताना आचार्य सुचवत आहेत की ज्यांच्या आयुष्यात भगवंताची कृपा नसते त्यांच्या आयुष्यात आलेल्या या सगळ्या गोष्टींना सोडून जाताना त्यांना अत्यंत दुःख होते.
यापैकी काहीही शेवटी त्याला सोबत येत नाही. शेवटी सोबत फक्त भगवंताची कृपाच असते.
यासाठी त्या भगवंताला नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply