जरॆयं पिशाचीव हा जीवितॊ मॆ
मृजामस्थिरक्तं च मांसं बलं च ।
अहॊ दॆव सीदामि दीनानुकम्पिन्
किमद्धापि हन्त त्वयॊद्भासितव्यम् ॥ ११ ॥
तारुण्यामध्ये स्वतःच्या क्षमतांनीच आपण सर्व काही करतो असे वाटत असणाऱ्या जीवाला जसे जसे वृद्धत्व प्राप्त होत जाते तस तशी त्याची ही क्षमता कमी होत जाते. मग त्याच्या भरवशावर असलेला ताठा देखील नष्ट होतो.
अशावेळी त्याला भगवंता शिवाय कशाचाही आधार नसतो. त्याच्या या निराधार अवस्थेचा विचार व्यक्त करताना आचार्य श्री म्हणतात,
जरॆयं पिशाचीव – एखाद्या पिशाचिनी प्रमाणे म्हणजे हडळी प्रमाणे, ही जरा म्हणजे म्हातारपण,
हा जीवितॊ मॆ – माझ्या जीविताला म्हणजे आयुष्याला,
मज्जामस्थिरक्तं च मांसं बलं च –
मज्जातंतू अस्थी रक्त मांस आणि बल
या सगळ्या गोष्टींना खात आहे. हळूहळू नष्ट करत आहे.
येथे आचार्य म्हातारपणाला एखाद्याच्या हडळीची उपमा देत आहेत. हडळी एखाद्या मरणासन्न एक जिवंत प्राण्याचे देखील लचके तोडून खायला कमी करत नाही. तशी म्हातारपणाची अवस्था आहे.
माणूस जिवंत असतानाच त्याच्या एकेक क्षमता म्हातारपणामुळे अशा नष्ट होतात. त्या प्रत्येक गोष्टीचे त्याला लचके तोडले यासारखेच दुःख होते. असह्य वेदना होतात.
सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशा या विचित्र अवस्थेचे वर्णन आचार्य किती नेमकेपणाने करत आहेत.
असा जीव मग भगवंताला साद घालतो,
अहॊ दॆव सीदामि – हे भगवंता मी थरथर कापत आहे. दुःखी होत आहे.
दीनानुकम्पिन् – हे दीनानुकंपिन् ! आपण दीन अर्थात दु:खी लोकांवर कृपा करणारे आहात.
किमद्धापि हन्त त्वयॊद्भासितव्यम् – हे भगवंता आपण आणखीनही उदासीनच राहू इच्छिता का?
अर्थात अशा विपरीत परिस्थितीत देखील आपण माझे संरक्षण करणार नाही का?
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply