कफव्याहतॊष्णॊल्बणश्वासवॆग-
व्यथाविस्फुरत्सर्वमर्मास्थिबन्धाम् ।
विचिन्त्याहमन्त्यामसह्यामवस्थाम्
बिभॆमि प्रभॊ किं करॊमि प्रसीद ॥ १२ ॥
वृद्धावस्थेत विविध व्याधींच्या द्वारे जीवाची होणारी दयनीय अवस्था सर्वच विचारवंतांनी चिंतनाचा विषय केलेली आहे.
त्यावेळी त्याला भगवंता शिवाय कोणाचाही आधार उरत नाही.
अशावेळी भगवंताची प्रार्थना करणारा तो जीव ज्या प्रकारची करुणा भाकतो त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
कफव्याहतॊष्णॊल्बणश्वासवॆग-
श्वासनलिकेत मध्ये कफ साठल्यामुळे अवरुद्ध झालेला श्वास आपला वेग वाढवतो. अर्थात श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्याने संपूर्ण शरीर गलितगात्र होते आणि इंद्रियांचा थरकाप होतो.
मन सैरभैर होते. आता आपण मरणार या कल्पनेने तो जीव प्रचंड अस्वस्थ होतो.
व्यथाविस्फुरत्सर्वमर्मास्थिबन्धाम् – सर्व अस्थींचे बंध अर्थात हाडांचे जोड व्यथित होऊन कुरकुर करायला लागतात. त्यांच्यातून प्रत्येक हालचाली च्या वेळी येणारा कुर कुर असा आवाज ऐकून त्यांची कुरकुर होणे असा शब्द निर्माण झाला.
अशावेळी त्या जोडांमध्ये प्रत्येक हालचालीगणिक प्रचंड वेदना होतात.
विचिन्त्याहमन्त्यामसह्यामवस्थाम् – अशा या माझ्या अंतिम , असहाय्य अवस्थेचा विचार करून
बिभॆमि प्रभॊ – हे प्रभु मी घाबरून जातो.
किं करॊमि – आता मी काय करू हेच मला सुचत नाही. माझ्या कोणत्याही उपायांनी या आलेल्या परिस्थितीवर मला उपाय सापडत नाही. परिस्थिती दिवसागणिक अधिकच वाईट होत जाते.
प्रसीद – अशा माझ्या समान अगतिक झालेल्या भक्तावर तू प्रसन्न हो.
हे भगवंता तुला नमस्कार असो
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply