लपन्नच्युतानन्त गॊविन्द विष्णॊ
मुरारॆ हरॆ नाथ नारायणॆति ।
यथाऽनुस्मरिष्यामि भक्त्या भवन्तम्
तथा मॆ दयाशील दॆव प्रसीद ॥ १३ ॥
सामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते.
कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो.
वास्तविक हे आपले नाव अत्यंत सामान्य आहे. बारा दिवसानंतर मिळाले आहे. आई-वडिलांनी त्यांना आवडणारे ठेवले आहे. तरी आपल्या नावाचा आपल्याला एवढा आनंद होतो. या नावाच्या भरवशावर काहीही होत नसले तरी आपल्याला त्याचा एवढा अभिमान असतो.
तर मग विचार करा ज्याच्या नावावर सर्व संसार चालतो त्या भगवंताला त्याचे ते नाव किती प्रिय असेल?
त्यासाठीच नामस्मरणाला इतके महत्त्व आले. ते सांगतांना आचार्य म्हणतात,
लपन्नच्युतानन्त गॊविन्द विष्णॊ
मुरारॆ हरॆ नाथ नारायणॆति ।
अच्युतं ,अनंत, गोविंद, विष्णु, मुरारी, हरी, नाथ म्हणजे जगन्नाथ ,नारायण अशा विविध नावांचा मी लपन् अर्थात आलाप करीत राहतो. वारंवार वारंवार या नावांचा उच्चार करीत राहतो.
संगीतामध्ये एकच ओळ, शब्द वेगळ्या अंगाने, ढंगाने सादर केला जातो त्याला आलाप म्हणतात. तसे तुझे यातील एकच नाव मी दुःखात कळवळून तर आनंदात उत्साहाने घेत असतो. त्याच नावाचा आलाप करीत राहतो.
यथाऽनुस्मरिष्यामि भक्त्या भवन्तम् – जसे जमेल तसे तुझी स्मरण करीत असतो. मात्र या स्मरणात कायम माझी भक्ती असते. अर्थात भावपूर्वक मी तुझे नाव घेतो.
तथा मॆ दयाशील दॆव प्रसीद – त्यामुळे दयाशील असणाऱ्या हे भगवंता माझ्यावर प्रसन्न हो.
तुझ्याशिवाय मला कोण आसरा आहे?
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply